पाणी प्रश्न व अवैध दारूने गाजली ग्रामसभा
By admin | Published: May 13, 2017 01:12 AM2017-05-13T01:12:30+5:302017-05-13T01:12:30+5:30
ग्रामपंचायतीची विशेष तहकुब ग्रामसभा गुरुवारी ग्रामपंचायतीच्या मैदानावर पार पडली.
पोलिसांचा बंदोबस्त : सरपंच-सदस्यात रोजंदारी कर्मचाऱ्यावरून उफाळला वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड: ग्रामपंचायतीची विशेष तहकुब ग्रामसभा गुरुवारी ग्रामपंचायतीच्या मैदानावर पार पडली. ही सभा गावात असलेली पाणी टंचाई आणि अवैध दारूविक्रीने चांगलीच गाजली. शिवाय या सभेत सरपंच आणि सदस्यात रोजंदारीच्या कर्मचाऱ्यावरून वाद उफाळल्याने या वादात पोहोचला. एकूण विविध विषयांवर झालेल्या चर्चेअंती ही सभा वादाचीच ठरली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंदा कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य डॉ. महेश गौर तर पं.स. सदस्य शेख ईस्त्राईल उपस्थित होते. प्रारंभी सभेचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी केले.
यानंतर वॉर्ड क्रमांक २ च्या सदस्या अंधीनी दाभणे यांनी व सदस्य हमीद पटेल यांनी रोजंदारी कर्मचाऱ्याच्या मुद्द्याला हात घातला. त्यांनी हा कर्मचारी सदस्यांशी असभ्य वागणूक करीत असून त्यांना सदस्याना धमकी देतो, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सरपंच व महिला सदस्यात वाद झाला. यानंतर १० दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने जनतेने सरपंचासह प्रशासनाला धारेवर धरले. तसेच गावात सर्वत्र अवैध दारू विक्रीला उधान आल्याचे सांगून महिला बचत गटाच्या विजया तेलरांधे व गुरूदेव सेवा मंडळाचे बबन दाभणे यांनी दारू बंदीचा मुद्दा उचलला.
सदर ग्रामसभा चोख पोलीस बंदोबस्तात झाली. या सभेत प्रभाकर चामचोर, प्रमोद दाभणे, रहीम शेख, फकीरा खडसे, हमीद पटेल, रिंकु दुबे, पुंडलिक सहारे, प्रभाकर डंभारे, राजू चामचोर, किशोर डडमल यांनी सहभाग घेतला. उपस्थितांचे आभार चंदु पंढरे यांनी मानले.