बोरधरणातून सोडलेले पाणी उठले शेतकऱ्यांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:00 AM2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:21+5:30
सद्या हरभरा व गहू यासह कपाशी व इतर पिकांना ओलीत करण्यासाठी बोरधरणाचे पाणी वितरीकांद्वारे सोडण्यात आले आहे. या वितरीका नियमीत साफ करण्याची व पाण्याचे नियोजन करण्याचे जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे;पण त्याकडे लक्ष देणारी यंत्रणा कुंबकर्णी झोपेत आहे. पाणी सोडण्यापूर्वी मुख्यवितरीका व छोट्या वितरीकांची साफसफाई करणे गरजेचे असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : बोरधरणाचे पाणी वितरकांव्दारे शेतकऱ्यांच्या शेतात पोहचवून परिसरात हरित क्रांती व्हावी म्हणून त्या काळात बोर नदीवर धरण बांधण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांच्या कामचुकार व नियोजन शून्य कारभारामुळे या वितरका ठिकठिकाणी फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेताची आणि पिकाची सद्या वाट लागत असल्याचे दिसून येत आहे.
सद्या हरभरा व गहू यासह कपाशी व इतर पिकांना ओलीत करण्यासाठी बोरधरणाचे पाणी वितरीकांद्वारे सोडण्यात आले आहे. या वितरीका नियमीत साफ करण्याची व पाण्याचे नियोजन करण्याचे जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे;पण त्याकडे लक्ष देणारी यंत्रणा कुंबकर्णी झोपेत आहे. पाणी सोडण्यापूर्वी मुख्यवितरीका व छोट्या वितरीकांची साफसफाई करणे गरजेचे असते. पण तसे झालेले नाही. त्याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांनी स्वत:हून नाल्या, नहर, साफ करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच वितरीकांना नुकसान पोहचविल्याचा दम देवून कारवाई करण्याचा धाक दाखविल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पाणी सोडण्यापूर्वी मुख्य कालवे वितरीका साफ न केल्याने व शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वितरीकेत पाणी सोडल्यावर त्या जेसीबीच्या सहाय्याने साफ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केला जात आहे. कोटंबा येथील रविंद्र देवतळे व विठ्ठल गजानन वाघमारे यांच्या शेताची पार वाट लावली आहे. या ठिकाणी काही अंतर सिमेंट काँक्रीटची वितरीका तर उर्वरीत मातीची आहे. संबधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सिमेंटने बांधून असलेल्या वितरिकेपेक्षा मातीचे खोदकाम असलेली वितरीका जास्त खोदल्याने पाणी वाहून न जात वितरीकेत मोठ्या प्रमाणात साचते. त्यामुळे जास्त प्रवाहामुळे ती फुटल्याने पूर्ण पाणी शेतातून वाहते. या वितरीकेचे सिमेंटचे बांधकाम अनेक ठिकाणी फुटून पाण्याने मार्ग काढला आहे.
पांदण रस्त्याचा झाला नाला
कोटंबा वितरीकेसह इतरही ठिकाणी शेतातील पाणी रस्त्यावर येवूनपांदण रस्ते खराब झाले आहे. पिकांच्या सिंचनासाठी धरणाचे पाणी सोडण्यात आले खरे; पण ते सिंचनापेक्षा वायाच जास्त जाते. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यत पाणी पोहचत नाही. सर्व वितरकांची सफाई व डागडूजी करण्याची गरज असून तशी मागणी आहे.
मी अत्यंत गरीब शेतकरी आहे. पाण्याच्या प्रवाहाने ती फुटली. शिवाय कपाशी आणि चणा पीक खराब होत आहे. शेतात पाणी शिरल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.
- विठ्ठल वाघमारे, शेतकरी.
माझ्या शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी खोदलेल्या नालीतून नहराच्या पाण्याचा मोठा प्रवाह गेल्याने माझे शेत खचले आहे. आता मला सिमेंट काँक्रीटची नालीच बांधावी लागणार आहे. हा खर्च करण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे.
- रविंद्र देवतळे, शेतकरी.