पाणीटंचाईचे भाजीपाल्यालाही चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:03 PM2019-04-14T22:03:38+5:302019-04-14T22:04:19+5:30
जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत असतात. अनेकांकडे सिंचनसुविधा उपलब्ध असली तरी उन्हामुळे पाणीपातळी खालावल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी भाजीपाला पीक कोमजत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत असतात. अनेकांकडे सिंचनसुविधा उपलब्ध असली तरी उन्हामुळे पाणीपातळी खालावल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी भाजीपाला पीक कोमजत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाला लागवड केल्यापासीन निघेपर्यंत त्याची काळजी घेत वेळोवेळी पाणी पाणी देण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागते. यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. याचाच परिणाम म्हणून भूगर्भातील जलाशयाची पातळी खालावल्याने शेतातील विहिरींनीही तळ गाठल्याचे चित्र आहे. यामुळे भाजीपाला पिकाला ओलित करणे कठीण झाले असून पीक कोमेजून जात आहे. पिकांना देण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने भाजीपाला पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघतो की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
भाजीपाला पिकाचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकºयांना तारेवरची कसरत कसरत करावी लागत आहे. अनेक शेतकºयांनी पिकाच्या संरक्षणाकरिता शेतीला तारेचे कुंपण घातले आहे. असे असले तरी श्वापदांचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. कित्येक शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी बुजगावण्याचा आधार घेतला आहे.
भाववाढीचा शेतकऱ्यांना मात्र लाभ नाही
दरवर्षी उन्हाळ्यात आवक घटत असल्याने भाजीपाल्याचे भाव वधारतात. यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे सर्वच ठिकाणी भाजीपाल्याचे पीक संकटात आले आहे. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आवक मंदावली, तर जिल्ह्यातील भाजीपाला पीक सिंचनाअभावी धोक्यात आले. याचाच परिणाम म्हणून बाजारपेठेत सर्वच भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. कांदे, बटाटे, टमाटर यांचे भाव वगळता मिरची, वांगी, पत्ताकोबी, फुलकोबी, गवार, कारले, भेंडी, कोथिंबीर, यांचे भाव गगनाला भिडले आहेत. या भाववाढीचा शेतकऱ्यांचा मात्र फायदा नाही. यात दलाल मालामाल होत आहे. तर सर्वसामान्यांचे भाजीपाल्याच्या दरवाढीमुळे आर्थिक बजेट कोलमडल्याचे चित्र आहे.
नदीपात्राला कोरड; जलसंकटाची चाहूल
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : एप्रिल महिन्यातच तीव्र सूर्यप्रहार होत असल्यामुळे तापमानात कमालीची वाढ होऊन पारा ४३ अंशांवर पोहोचला आहे. मागील दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान अल्प प्रमाणात झाल्यामुळे चिकणी, जामणी, निमगाव, सोनेगाव (आबाजी), पढेगाव व परिसरातील गावांमध्ये जलसंकट गडद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
चिकणी, जामणी, निमगाव, पढेगाव ही चारही गावे भदाडी नदीतीरावर वसले असून सोनेगाव (आबाजी) यशोदा नदीतीरावर आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे अल्पावधीतच नदीपात्र कोरडे झाले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. हल्ली नदीपात्रात जनावरांना तर सोडा; पण पशुपक्ष्यांना सुद्धा पिण्यास पाणी राहिले नाही. याकरिता जनावरांना तथा पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामध्ये कित्येक जनावरे व पशुपक्षी मृत्युमुखी पडत आहेत.
जंगलव्याप्त भागात बरेच कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. शेतकरी तथा गोपालक या शिवारामध्ये कृत्रिम पाणवठ्याची शासन दरबारी मागणी करीत आहे. चारही गावांच्या नळयोजनेच्या विहिरी भदाडी नदीपात्रात करण्यात आल्या आहेत. परंतु पढेगाव येथील विहिरीच्या पाण्याची पातळी जास्तच खोल गेल्यामुळे येथे एक दिवसाआड नळाला पाणी येते. मागच्यावर्षी पर्यंत पाणी मुबलक मिळत असे; परंतु यावर्षी मात्र नळयोजनेच्या विहिरीला अपुरे पाणी असल्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो, असे गावकरी सांगतात.