अर्धवट कामामुळे घरात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:13+5:30
पाईपलाईन टाकण्यासाठी परिसरातील सिमेंट रस्ते फोडण्यात येत आहे. पण, अद्यापही योजनेचे काम पूर्णत्त्वास न गेल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो आहे. ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर गिट्टी तशीच पडून आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कुठे नळजोडणीचे काम अपूर्ण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जीवन प्राधिकरणतर्फे नळ जोडणीचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे तर कुठे रस्ताच पोखरण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणच्या अपूर्ण कामामुळे शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नालीतील सांडपाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे संपूर्ण रात्र नागरिकांना जागून काढावी लागली. या प्रकारामुळे प्राधिकरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सिंदी (मेघे) परिसरातील वॉर्ड तीनमध्ये प्राधिकरणाच्यावतीने मागील सहा महिन्यांपासून नळयोजनेचे कासवगतीने काम सुरू आहे.
पाईपलाईन टाकण्यासाठी परिसरातील सिमेंट रस्ते फोडण्यात येत आहे. पण, अद्यापही योजनेचे काम पूर्णत्त्वास न गेल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो आहे. ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर गिट्टी तशीच पडून आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कुठे नळजोडणीचे काम अपूर्ण आहे. नळाचे पाणी रस्त्यावर येत असून चिखल तयार होत रस्त्यावर पसरत आहे. रस्त्याच्या कडेला खोदलेल्या नाल्यांमुळे तसेच जीवन प्राधिकरणाच्या अपूर्ण कामामुळे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले.
त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली. मात्र, याकडे जीवन प्राधिकरणचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
घरातील धान्यसाठा भिजला
शनिवारी झालेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. पावसाचा जोर कायम असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरातील धान्यसाठा तसेच इतर महत्त्वाचे कागदपत्रं ओले झाले.
रस्त्याच्या मधात खड्डे करण्यात आले. नळ जोडणी केल्यानंतर खड्डे बुजविण्यास मात्र विसर पडला. अग्निहोत्री कॉलेजच्या बाजूच्या रस्त्यावर गिट्टी पसरली असून रस्त्याकडेची कामे पूर्ण केलेली नाही. प्रशासनाने लक्ष देत तत्काळ काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करावे लागणार.
- कोमल प्रमोद खंडारे
सदस्य, ग्रामपंचायत, सिंदी (मेघे)
मागील सहा महिन्यांपासून नळ योजनेचे काम सुरू आहे. प्राथमिक शाळा ते ग्रामपंचायतपर्यंतच्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. हे काम संथगतीने सुरू आहे. कुठे नळजोडणीचे काम अपूर्ण आहे. तर रस्त्यावर नळजोडणीकरीता करण्यात आलेले खड्डे बुजविण्याचा विसर पडला आहे. अपूर्ण काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे.
- धर्मराज वैद्य,
ग्रामपंचायत, सिंदी (मेघे)
अपूर्ण कामामुळे दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. पण, प्राधिकरणाचे याकडे लक्ष नाही. तत्काळ योजनेचे काम पूर्ण करण्यात यावे.
- उत्कर्ष देशमुख,
ग्रामपंचायत, सिंदी (मेघे)
प्राधिकरणचे काम सुरु झाल्यापासून रस्त्यावरील तसेच नालीचे पूर्ण पाणी घरात शिरत आहे. शनिवारी झालेल्या पावसाचे पाणी घरात शिरले. त्यामुळे रात्र जागून पाणी काढावे लागले. घरातील जीवनावश्यक साहित्य ओले झाले.
- किशोर लेंडे, सिंदी (मेघे) येथील रहिवासी.
पावसाच्या पाण्यात सिमेंट पोती ओली
नळयोजनेच्या कामसाठी सिमेंटच्या थैल्या रस्त्यावर उतरविल्या होत्या. पण, संथ गतीने कामकाज सुरू असल्याने काही पोती रस्त्याकडेलाच ठेवून होती. शनिवारी झालेल्या पावसाने संपूर्ण पोती भिजली. याचा भुर्दंड कोण भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.