पाण्याअभावी चाराटंचाईच्या झळा; विदर्भातील गोपालक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:54 AM2019-04-15T11:54:59+5:302019-04-15T11:55:32+5:30

जिल्ह्यातील बैलबाजारांचा महाराष्ट्रात नावलौकिक होता. मात्र, सध्या पाणी व चारा टंचाईच्या झळांमुळे बैलांसह इतर जनावरांचा बाजार चांगलाच फुलताना दिसून येत आहे.

Water shortage; farmer in trouble in Vidarbha | पाण्याअभावी चाराटंचाईच्या झळा; विदर्भातील गोपालक अडचणीत

पाण्याअभावी चाराटंचाईच्या झळा; विदर्भातील गोपालक अडचणीत

Next
ठळक मुद्देबैलजोडींची किंमत पोहोचली अडीच लाखांवर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील बैलबाजारांचा महाराष्ट्रात नावलौकिक होता. कालांतराने आधुनिकतेमुळे बैलांची मागणी कमी झाल्यामुळे बैलबाजारातील बैलजोड्यांचीही संख्या रोडावत गेली. मात्र, सध्या पाणी व चारा टंचाईच्या झळांमुळे बैलांसह इतर जनावरांचा बाजार चांगलाच फुलताना दिसून येत आहे. हीच स्थिती विदर्भातील यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतही दिसून येत आहे.
वर्धा जिल्ह्यातील देवळी, आंजी, आर्वी, समुद्रपूर, सिंदी व सेलू या भागात नियमित बैलबाजार भरतो. यातील देवळी, समुद्रपूर व सेलूचा बाजार महाराष्ट्रात परिचित होता. शेतकऱ्यांसह बैल व्यापाऱ्याचे देखणे बैल या बाजारातील दावणीला बांधलेले दिसायचे. महागाई वाढतगेल्याने बैलांच्या किमतीही चांगल्याच वाढल्या. ५० हजार रुपयांपासून २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत बैलजोड्या या बाजारात विक्रीकरिता असतात. शेतात तांत्रिक वापर वाढल्याने आणि मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी बैलजोडी कमी करीत यंत्राद्वारे शेती करण्यावर भर दिला. त्यामुळे बैलजोडीची मागणी कमी होत गेली आहे. याचाच परिणाम बैलबाजारावरही झाल्याने या भागातील बैलबाजारही नावापुरतेच शिल्लक राहिले. त्यात यावर्षी पाणी व चाराटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकºयांनी आता बैलांची आवश्यकता असल्याने बैलजोडी ठेवून इतर गोधन विकायला सुरुवात केली आहे. इच्छा नसतानाही गोठ्यातील जनावरांना परिस्थितीमुळे विकावे लागत आहे. काहींनी तर आपली जनावरे इतरत्र नातेवाईकांकडे किंवा चारा असलेल्या ठिकाणी हलविली आहेत. दुभत्या जनावरांव्यतिरिक्त इतर गोधन बाजाराची वाट धरत आहे. ही स्थिती आता कमी दिसत असली तरी येत्या दिवसात ही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वैरणाचा खर्च अन मजुरीचे दरही वाढले
जिल्ह्यात प्रारंभी मोठ्या प्रमाणात ज्वारीचा पेरा व्हायचा. त्यामुळे जनावरांना कडबा (वैरण) मिळायचा. सोबतच सोयाबीन, चणा व तुरीचे कुटारही सहजगत्या उपलब्ध व्हायचे म्हणून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न नव्हता. मात्र, आता ज्वारीच्या पेºयाकडे दुर्लक्ष झाले. सोयाबीनचे कुटारही १ हजार बंडी तर तुरीचे कुटार २ हजार रुपये बंडीवर पोहोचले आहे. आधीच अत्यल्प उत्पादनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हा वैरणावरील खर्च परवडणारा नाही. ज्यांच्याकडे दुधाळ जनावरे आहेत, त्यांना ओला चारा व सरकी, ढेप खरेदी करावी लागते. सोबतच ही जनावरे चारण्याकरिता वेगळा गुराखीही ठेवावा लागतो. ढेप सध्या २ हजार ८०० रुपये क्विंटल झाली असून गुराख्याला वार्षिक ९० हजार रुपये वेतन द्यावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना आता जनावरांचा पसारा सांभाळणे कठीण होत आहे

जनावरे विक्रीची कारणे
जिल्ह्यात यावर्षी जलाशयाने तळ गाठल्याने कधी नव्हे, इतकी पाणी संमस्या गंभीर झाली आहे. यावर्षी २७ टक्क्यांपेक्षाही कमी जलसाठा असल्याने गावागावांत पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. शेतशिवारातही पाणी नसल्याने जनावरांना पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे.
यावर्षी सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिल्याने जंगल परिसरात चारा उपलब्ध नाही. दरवर्षी शेतात चाऱ्याची पेरणी केली जायची. मात्र, यावर्षी विहिरींनाही पाणी नसल्याने चाऱ्यांची पेरणी कमी झाली आहे.
ग्रामीण भागात शेतकरी व गोपालक महिनेवारी जनावरे चराईकरिता सोडतात. परंतु, यावर्षी जंगलात चारा नसल्याने गाई चारणाºयाने गायगोहण चारण्यास नकार दिला आहे.

जनावरे शेतकऱ्यांचे वैभव आहे; परंतु पाणी आणि चारा टंचाईमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. वैरणाचाही खर्च वाढला असून जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत जनावरांचा सांभाळ करणे कठीण होत आहे. त्यामुळे जनावरांची संख्या कमी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
संजय कुटे, शेतकरी

यांत्रिकीकरणाचा फटका बैलबाजाराला बसला आहे. तरीही काही शेतकरी दरवर्षी बैलजोडी बदलविल्याशिवाय राहात नाही. बैलांची मागणी शेतकरी करीत असतो. त्यामुळे बाजारात देखणे बैल विक्रीकरिता आणले जातात. यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता जाणवत असल्याने शेतकऱ्यांचे गोधनही विक्रीकरिता बाजारात येताना दिसून येत आहे. ही स्थिती पुढेही वाढण्याची शक्यता आहे.
विठ्ठल सुरकार, व्यापारी

Web Title: Water shortage; farmer in trouble in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.