जलजागृतीसाठी वर्ध्यात जलचळवळीचे तुफान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 09:24 PM2019-04-16T21:24:26+5:302019-04-16T21:25:19+5:30
जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्याने नागरिकांना आता पाणी बचतीचे महत्त्व कळू लागले. याच दरम्यान वॉटर कप २०१९ या स्पर्धेलाही सुरुवात झाल्याने जलचळवळीकरिता अनेक सामाजिक संघटना एकत्र आल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्याने नागरिकांना आता पाणी बचतीचे महत्त्व कळू लागले. याच दरम्यान वॉटर कप २०१९ या स्पर्धेलाही सुरुवात झाल्याने जलचळवळीकरिता अनेक सामाजिक संघटना एकत्र आल्या आहे. त्यांना प्रशासनाचीही साथ मिळणार असल्याने आता वर्ध्यात जलजागृतीकरिता तुफान उभे राहणार आहे. यासंदर्भात नुकताच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र पार पडले असून त्यामध्ये वर्धेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
स्थानिक विकास भवनामध्ये जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासन, वैद्यकीय जनजागृती मंच, पानी फाउंडेशन आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी सुरु होणाºया वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांकरिता मशीन कामाचे नियोजन तसेच त्यांना येणाºया अडचणी आणि कामाच्या दृष्टीने अपेक्षा यावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभागी गावातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेऊन लवकरच निकाली काढण्याची हमी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी केले. पानी फाउंडेशनचे चिन्मय फुटाणे यांनी स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. संचालन डॉ. अमोल गाढवकर यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी मानले. यावेळी जनहित मंच, युवा सोशल फोरम, निसर्ग सेवा समिती, श्रमिक पत्रकार संघ, बहार नेचर फाउंडेशन, हेलपिंग हार्ट, जय हिंद संघटना, आधारवड, जिल्हा अन्नदान समिती, आपले सरकार कक्ष, निमा, माजी सैनिक संघटना आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.