देवळीचा पाणीपुरवठा १३ दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:00 PM2018-08-13T23:00:07+5:302018-08-13T23:00:30+5:30
जीवन प्राधिकरणचा बेजबाबदारपणा व स्थानिक नगर पालिकेच्या नियोजन शुन्यतेमुळे येथील पाणीपुरवठ्याचे भवितव्य अंधातरी ठरले आहे. हा पाणीपुरवठा अंदोरी येथील वर्धा व देवळी येथील यशोदा या दोन नद्यावरून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : जीवन प्राधिकरणचा बेजबाबदारपणा व स्थानिक नगर पालिकेच्या नियोजन शुन्यतेमुळे येथील पाणीपुरवठ्याचे भवितव्य अंधातरी ठरले आहे. हा पाणीपुरवठा अंदोरी येथील वर्धा व देवळी येथील यशोदा या दोन नद्यावरून होत आहे. वर्धा नदीवरून शहराला होणारा पाणीपुरवठा तब्बल तेरा दिवसापासून बंद आहे. जीवन प्राधीकरणाने महावितरण कंपनीचे विद्युत आकारणी देयक न भरल्यामुळे ही परिस्थिती ओढावली. नदीवरून होणारा पाणीपुरवठा मर्यादीत स्वरूपात होत आहे. या योजनेच्या दोन मोटारीपैकी एक मोटार बरेच दिवसापासून नादुरुस्त असल्याने येथील नागरिकांना दोन-दोन दिवसपर्यंत पाणी मिळत नसल्याची ओरड आहे.
अंदोरी येथील वर्धा नदीवरून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची नुकतीच पुर्नबांधणी करण्यात आली. ही योजना ३५ कोटीच्या खर्चातून नव्याने उभी राहिली आहे. काही बाबी वगळता प्राधिकरणने या योजनेचे काम जवळपास पूर्ण केले आहे. वॉटर फिल्टर प्लॅन्ट २५ मे पासून कार्यान्वीत होवून शहराला पाणीपुरवठा होत आहे. येणाºया तीन वर्षापर्यंत ट्रायल म्हणून या योजनेचा कार्यभार जीवन प्राधिकरणकडे राहणार आहे. यानंतर ही योजना स्थानिक न.प. ला हस्तांतरीत होणार आहे. त्यामुळे सध्या विद्युत देयकाचा भरणा जीवन प्राधिकरणलाच करावा लागणार आहे.
जीवन प्राधिकरण प्रशासनाच्या लालफीतशाहीमुळे विद्युत देयकाचे पैसे वेळेवर येत नसल्याने पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. याआधी सुध्दा एक-दोन वेळा हा प्रकार झाला आहे. यावेळेस तब्बल तेरा दिवस होवून सुध्दा महावितरणकडे पैशाचा भरणा न केल्यामुळे संपूर्ण योजनाच बंद पडली आहे. मुंबईच्या जीवन प्राधिकरण बोर्डाकडून हे पैसे येत असल्याने देयक भरण्यास वेळ होत असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगितले जात आहे.
स्थानिक यशोदा नदीवरून होणाºया न.प. च्या पाणीपुरवठा योजनेची सुध्दा अशीच स्थिती आहे. यशोदेच्या पात्रात असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीतून २५ व ३० हॉर्स पॉवरच्या दोन मोटारीचे माध्यमातून पाणी लिप्ट करण्याची व्यवस्था आहे. परंतु यापैकी एक मोटार गेल्या काही दिवसापासून नादुरुस्त आहे. त्यामुळे उर्वरीत एका मोटारीवर काम भागविले जात असल्याने देवळीकरांना दोन-दोन दिवसापयंत पिण्याच्या पाण्यापासून वंचीत राहावे लागत आहे. पिण्याचे पाण्यासाठी विधंन विहिरींचा सहारा घ्यावा लागत आहे.
पाणी पुरवठा योजनेचे दीड लाखाचे विद्युत देयक प्राधीकरणकडे थकीत आहे. स्थानिक न.प. कडून लोकवर्गणी म्हणून मिळालेल्या धनादेशातून मुंबई प्राधीकरण बोर्डाकडे विद्युत देयकाची मागणी केली आहे. एक-दोन दिवसात देयकाचा भरणा केला जाणार आहे. महावितरण कंपनीने कनेक्शन तोडण्याची घाई न करता प्रत्येक महिन्याला काही दिवसांची अवधी द्यावी. यासाठी लेखी हमी देण्यास तयार आहे.
- दीपक वाघ, शाखा अभियंता, जीवन प्राधिकरण, वर्धा.