टँकरद्वारे पाणी पुरवठा नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:52 PM2019-05-27T21:52:04+5:302019-05-27T21:52:27+5:30
शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या ग्रामपंचायत परिसरातील काही भागात यावर्षी पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेत ग्रामपंचायतने लोकसहभागतून तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या ग्रामपंचायत परिसरातील काही भागात यावर्षी पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेत ग्रामपंचायतने लोकसहभागतून तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पिपरी (मेघे) ग्रामपंचायतला जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. जलाशयाने तळ गाठल्यामुळे नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने काही भागात सहाव्या दिवशी तर काही भागात दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. जवळपास ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील विहिरी व कुपननिकांही कोरड्याठाक झाल्याने काही भागात पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरु आहे. आगामी समस्या लक्षात घेता ग्रामपंचायतने प्रशासनाकडे टँकरची मागणी केली होती. पण, प्रशासनाने टँकर उपलब्ध करुन न दिल्याने शेवटी ग्रामपंचायतनेच लोकसहभागातून तीन टँकर मिळवून पाणी समस्येवर मात केली आहे. दररोज आता टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. सोमवारी सकाळपासून सावजीनगर, पेंदाम ले-आऊट, गांजरे ले-आऊट व मालेकर ले-आऊट या परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला आहे. प्रत्येक कुटूंबाला दोन ड्रम पाणी पुरविले जात आहे. कमी पाणी मिळत असले तरीही नागरिकांचा त्रास वाचल्याचे सांगितले जात आहे.
यांनी दिला सहकार्याचा हात
ग्रामपंचायत पिपरी (मेघे) परिसरातील भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून १२ हजार लिटर क्षमतेचा १ टँकर भेट देण्यात आला.पण, एका टँकरने ही समस्या निकाली निघणारी नसल्यामुळे आमदार डॉ.पंकज भोयर मित्र परिवार आणि सरपंच अजय गौळकर मित्र परिवाराच्यावतीने ५ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या तिन्ही टँकरच्या सहाय्याने सध्या पाणी पुरवठा सुरु आहे.
गावातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. आता पाण्यासाठी नागरिकांची होणारी पायपीट पाहून ग्रामपंचायत प्रशासनाने लोकसहभागातून समस्या निकाली काढण्याचा ठराव घेतला. त्यानुसार तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. प्रति कुटूंबाला दोन ड्रम पाणी यानुसार पाणीपुरवठा सुरु असून नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
-अजय गौळकर, सरपंच, पिपरी (मेघे).