वर्धेकरांसाठी यंदा मुबलक पाणीसाठा
By Admin | Published: May 11, 2017 12:34 AM2017-05-11T00:34:09+5:302017-05-11T00:34:09+5:30
वादळी वाऱ्यामुळे येळाकेळी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दोन यंत्र बंद पडले होते.
वर्धेकरांसाठी यंदा मुबलक पाणीसाठा
येळाकेळीतील दोन्ही फीडर सुरू : ८.२३ टक्के जलसाठा उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वादळी वाऱ्यामुळे येळाकेळी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दोन यंत्र बंद पडले होते. यामुळे शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सदर यंत्र दुरूस्त करण्यात आले असून सध्या ११ पैकी ८.२३ टक्के जलसाठा वर्धेकरांसाठी उपलब्ध आहे. यामुळे दोन महिने पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नाही, अशी माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी नगर पालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी ११ टक्के पाणी उपलब्ध करून दिले होते. पैकी केवळ ३ टक्केच पाणी आतापर्यंत वापरात आणण्यात आले आहे. वर्धा शहरातील नागरिकांच्या वाट्याचे ८.२३ टक्के पाणी अद्याप शिल्लक आहे. येत्या दोन महिन्यांत प्रती महिना ३ टक्के पाण्याचा नागरिकांना पुरवठा केला तरी बऱ्यापैकी पाणी शिल्लक राहिल; पण संभाव्य स्थिती लक्षात घेता २५ मे रोजी बैठक घेत योग्य नियोजन केले जाईल. सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. गरज पडल्यास दोन दिवसाआड पाणी पुरवठा करू; पण उपलब्ध पाणीसाठा पाहता अशी परिस्थिती उद्भवणार नाही, असेही तराळे यांनी सांगितले. यामुळे मे व जून महिन्यात वर्धेकरांना जलसंकटाला सामोरे जावे लागण्याचे कुठलेही संकेत नाहीत.