पाणी पुरवठा विहीर सुरक्षा भिंतीविनाच
By admin | Published: November 11, 2016 01:50 AM2016-11-11T01:50:32+5:302016-11-11T01:50:32+5:30
सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावाला दीड कोटी रुपये किंमतीची नवीन नळ योजना कार्यान्वित करण्यात येत आहे.
नवी योजना : ताराच्या कुंपणाची मागणी
घोराड : सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावाला दीड कोटी रुपये किंमतीची नवीन नळ योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेसाठी नव्याने विहिरीचे खोदकाम व बांधकाम करून गावाला पाणी पुरवठा ही सुरू करण्यात आला. मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला सुरक्षा भिंत नसल्याने नागरिकांकडून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
गावासाठी १९७५ मध्ये नळ योजना कार्यान्वित झाली. त्यावेळी दोन विहिरीद्वारे नळाला पाणी पुरवठा करण्यात आला. तेव्हा ४० वर्षांपूर्वी अमलात आणल्या गेलेल्या पाणी पुरवठा योजनेत या दोनही विहिरीच्या सुरक्षेसाठी तारेचे कुंपन व दरवाजा याचे प्रावधान होते. ही नळयोजना जुनी झाल्याने व जलवाहिन्या जिर्ण झाल्याने गावासाठी नवीन नळयोजना मंजूर झाली. त्या योजनेचे काम पूर्ण झाल्याचा गवगवा शासकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आला. घोराड या गावापासून खापरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावापासून सव्वा कि़मी. अंतरावर या योजनेची विहीर आहे. मात्र तिला सुरक्षा भिंत नसल्याने सहा हजार नागरिकांची सुरक्षा यामुळे कशी केली जाणार अशी शंका निर्माण होत आहे. या विहिरीला सुरक्षा भिंत बांधण्यात यावी अशी मागणी होत आहे. तांत्रिक दृष्ट्या योजनेचे काम चांगले असल्याचे प्रशस्त पत्र अधिकारी देत असतांनाच अल्पावधीतच या विहिरीची तोंडी चा काही भाग खचल्याचे दिसून येत आहे.
विहिरीला सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा भिंत नसली तरी तारेचे कुंपन करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थ चर्चा करीत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)