तीन वर्षांपासून पाणीपट्टीकर भरलाच नाही; पालिकेकडे थकले ५.७३ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 17:12 IST2025-02-24T17:11:20+5:302025-02-24T17:12:24+5:30
Wardha : पाटबंधारे विभाग अॅक्शन मोडवर

Water tax has not been paid for three years; Rs 5.73 crore is owed to the municipality
सटवाजी वानोळे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहराला धाम धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी वर्धा पालिकेला पाटबंधारे विभागाकडून नाममात्र शुल्कात पाणी उपलब्ध करून दिले जाते. असे असताना गत तीन वर्षापासून पालिकेने पाटबंधारे विभागाला पाण्याचा करच अदा केला नाही. पाण्याच्या कराची ही रक्कम तब्बल ५ कोटी ७३ लाख रुपयांवर पोहोचली आहे. थकीत रकमेचा वाढता आकडा लक्षात घेता पाटबंधारे विभाग अॅक्शन मोडवर आला असून, पालिकेची कोंडी करण्याच्या तयारीत आहे.
जिल्ह्यातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पाटबंधारे विभागाने तलाव, धरणाची निर्मिती केली. यातून मोठचा शहरासह ग्रामपंचायत तसेच जिल्ह्यातील उद्योग कारखाने मोठे प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. मात्र, असे असताना एकट्या वर्धा पालिकेने गत तीन वर्षापासून कराचा भरणा केला नाही. शिवाय लघु उद्योगांसह, मोठ्या उद्योगांकडे लाखांची थकबाकी असल्याने जिल्ह्यातील आस्थापनांकडे थकबाकी असलेला आकडा २५ कोटी ३७ लाख ४० हजार रुपये एवढा आहे.
२८ प्रकल्पांतून होतो उद्योगांनाही पाणीपुरवठा
पाटबंधारे विभागाकडे ८ मोठे, तर २० लहान जलाशय आहेत. यातून जिल्ह्यासह चंद्रपूर तालुक्यातील काही भागांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पोथरा प्रकल्पामधून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा येथील बिल्ट ग्राफीक पेपर मिल व राजुरा नगरपरिषदेला पाणी पाणीपुरवठा केला जातो.
...यांना केला जातो पाणीपुरवठा
पाटबंधारे विभागाच्या लघु तसेच मोठ्या जलाशयातून वर्धा जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी मेघे व १३ गावे पाणीपुरवठा योजनांतर्गत धाम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वर्धा, व्यवस्थापन मध्य रेल्वे वर्धा, उत्तम व्हॅलू स्टील लिमिटेड, वर्धा, नगरपरिषद वर्धा, ग्रामपंचायत पवनार, ग्रामपंचायत आंजी, बोर अभयारण्यातील एक हॉटेल, विश्रामगृह बोर धरण, मत्स्य बीज केंद्र व एवोनिथ मेटॅलिक्स वर्धा यांना जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणीपुरवठा केला जातो.
२५.३७ कोटींची थकबाकी आस्थापनांकडे बाकी
पाटबंधारे विभागाची जिल्ह्यातील ग्रामपंचायत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा पालिका, तसेच उद्योग आस्थापनांकडे तब्बल २५ कोटी ३७लाख ४० हजारांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे कालवे दुरुस्तीसह अन्य कामे रखडली असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सर्वांत जास्त थकबाकी
मदन प्रकल्पामधून जामणी येथील मानस अॅग्रो अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सदर कंपनीने जीवन प्राधिकरणाचे ३१ जानेवारी २०२५ पर्यंत १७ कोटी ६६ लाख २९ हजार रुपये थकविले आहेत.
पाणी उचल करणारी यंत्रणा थकबाकी
पिपरी मेघे व तेरा गावे पाणी पुरवठा योजना ६२ लाख ५३ हजार
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ २५ लाख ५२ हजार
नगर परिषद वर्धा ५ कोटी ७३ लाख
ग्रामपंचायत पवनार ४ लाख ५९ हजार
ग्रामपंचायत आंजी १ लाख ९ हजार
मानस अॅग्रो इंड अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि., जामणी १७ करोड ६६ लाख १९ हजार
मे. बिल्ट ग्रॉफीक्स पेपर मिल बल्लारशहा ५८ लाख ३९ हजार
नगर परिषद राजुरा २५ हजार
हॉटेल अरण्यक बोरधरण ५७ हजार
विश्रामगृह बोर धरण ८६ हजार
मत्स्य बीज केंद्र १० लाख १४ हजार
एवोनिथ मेटॅलिक्स लि., वर्धा ३२ लाख ७६ हजार