आष्टीवासीयांची पाण्याकरिता भटकंती
By Admin | Published: March 12, 2016 02:21 AM2016-03-12T02:21:25+5:302016-03-12T02:21:25+5:30
पाणी पुरवठा योजनेचे ४ लाख २० हजार रुपये थकल्याने अखेर वीज वितरण कंपनीने विद्यूत पुरवठा खंडित केला.
वीज कापली : पाणी पुरवठ्याचे ४.२० लाख थकले
आष्टी (शहीद): पाणी पुरवठा योजनेचे ४ लाख २० हजार रुपये थकल्याने अखेर वीज वितरण कंपनीने विद्यूत पुरवठा खंडित केला. यामुळे गत तीन दिवसांपासून शहरातील नळांना पाणी आले नाही. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. केवळ नगराध्यक्षांच्या हलर्गीमुळे उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत असल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेवकांनी केला आहे.
आष्टी शहरातील पाणी पुरवठा योजना गत १५ वर्षांपासून जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येत होती. आष्टी नगरपंचायत स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषद सोबत संबंध तुटला. जिल्हा परिषद विभागाने आष्टी नगरपंचायतीला पाणीपुरवठा योजना स्वतंत्र करण्याकरिता पत्रद्वारे कळविले होते. परंतु सदर पत्राची आष्टी नगरपंचायतच्या नगराध्यक्षांनी दखल घेतली नाही. विद्युत विभागाचे गत सहा महिन्यांपासून थकीत असलेले वीज बिल भरण्याची काळजी सुद्धा घेतली नाही. २ मार्च २०१६ रोजी विद्युत विभागातर्फे आष्टी नगरपंचायतला थकीत वीज बिल भरण्याकरिता नोटीसही बजावण्यात आली होती.
आष्टी नगरपंचायतच्या न.प. फंडामध्ये मुबलक पैसे असूनही नगरपंचायततर्फे वीज बिल भरण्यात आले नाही. विद्युत विभागाचे अभियंता यांनी नगराध्यक्षांशी संपर्क करून या प्रकराची माहिती त्यांना दिली. यावर त्यांनी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे उत्तर दिले. विद्युत विभागाने वीज पुरवठा खंडीत करण्याच्या आठ दिवसांपासून नगरपंचायतला पूर्व कल्पना दिली होती. तसेच भाजपाच्या नगरसेवकांनी याकडे लक्षही वेधले होते; परंतु तरीही नगराध्यक्षांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे अखेर आष्टी शहराच्या पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा विद्युत विभागातर्फे खंडीत करण्यात आला. यावरुन आष्टी नगराध्यक्षांचा शहराप्रती बेजबाबदारापणा दिसत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. पाण्याच्या या ज्वलंत प्रश्नावर भाजपा गट नेत अशोक विजयकर, अॅड. मनीष ठोंबरे, अजय लेकुरवाळे, सुरेश काळपांडे, निर्मला दारोकर, वंदना दारोकर, प्रमोद गुप्ता व शहर भाजपा कार्यक्रर्त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.(प्रतिनिधी)
मायबाई वॉर्डात पाणी पेटले
आर्वी : येथील मायबाई वॉर्डात पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करीत आहे. ही मागणी मार्गी लावण्याकरिता तहसीलदारांना मागणीही करण्यात आली. असे असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. ही समस्या तात्काळ मार्गी न लागल्यास युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने कोरडा जल आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
मायबाई वॉर्ड येथील एका भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर होत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र होत आहे. या संदर्भात तहसील कार्यालयाला याची माहिती देण्यात आली आहे; परंतु येथे कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. मायबाई वॉर्ड कसबा येथील जवळपास ३०० कुटुंब या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. या वस्तीत गोरगरीब लोकांचे वास्तव्य आहे. येथील महिलांना जवळपास १ कि़मी. अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. ही बाब गांभीर्याने घेवून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी आहे. अन्यथा १४ मार्च रोजी युवा स्वाभिमानतर्फे उग्र व तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी न.पा. प्रशासनाची राहील, असे निवेदनातून कळविण्यात आले आहे.
निवेदन देताना प्रवीण वानखेडे, गुड्डू सोनटक्के, रविंद्र वानखेडे, जितेंद्र अवचारे, बबन एस. गायकवाड, सचिन प्रधान, अनिल कांबळे, रवी लांडगे, अरूण लांडगे, सुनील लांडगे, आकाश पवार, संदीप प्रदान, नरेश बावणे, सागर वाघमारे, सुभाष लांडगे, विनोद प्रधान, प्रविण लांडगे, मंगेश लांडगे, अजय गायकवाड, शंकर प्रधान, गोलू लांडगे, विलास प्रधान, राहुल प्रधान, नरेश बावणे, स्वप्निल प्रधान, विलास लांडगे, कैलास लांडगे, रवी लांडगे, सागर लांडगे, रमेश राऊत, आकाश लांडगे, संजय लांडगे, विक्की लांडगे इत्यादी कार्यकर्ते हजर होते.
आर्वी बसस्थानकावरही पाण्याची वानवा
आर्वी येथील बसस्थानकाचे नव्याने बांधकाम केले. अमरावती, वर्धा व इतर ठिकाणी प्रवास करणारे हजारो प्रवाशी येथे ये-जा करतात पण पाण्याची सोय नसल्याने त्यांचे हाल होत आहे. सेवानिवृत्त एस.टी. चालक पुरूषोत्तम पुरोहित यांनी प्रवाश्यांना व कर्मचाऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता आर.ओ. फिल्टर मशिन दान केली. मशिन लागून एक महिना होत आहे. ती बस स्थानक प्रशासनाच्यावतीने अजूनही सुरू करण्यात आली नाही.
त्यामुळे प्रवाश्यांना व एस.टी. कर्मचाऱ्यांना पिण्याकरिता घरून पाणी आणवे लागते. बस वेळापत्रकापेक्षा उशिराच येत असल्याने प्रवाश्यांना एक दोन तास बसची प्रतीक्षा नित्याचीच झाली आहे. या काळात त्यांची पाण्याकरिता चांगलीच पंचाईत होते. नाईलाजाने पाण्याकरिता पैसे मोजावे लागते. बसस्थानक परिसरात पिण्याचे पाणी नसल्यामुळे प्रवाश्यांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. एस.टी. प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसते.