मुदतबाह्य शुुद्धीकरण केंद्रातून वर्धेकरांना पाणी

By admin | Published: March 20, 2016 02:14 AM2016-03-20T02:14:14+5:302016-03-20T02:14:14+5:30

वर्धेकरांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता पवनार येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले.

Water from Wardhaarar to the Expiry Center | मुदतबाह्य शुुद्धीकरण केंद्रातून वर्धेकरांना पाणी

मुदतबाह्य शुुद्धीकरण केंद्रातून वर्धेकरांना पाणी

Next

तपासणीकरिता तज्ज्ञ नाही, पाईपलाईनही झाली जीर्ण
रूपेश खैरी, पराग मगर वर्धा
वर्धेकरांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता पवनार येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. या केंद्राला सुमारे ४५ वर्षांचा कालावधी होत आहे. यामुळे येथील यंत्रसामग्री जिर्ण झाली असल्याने येथील पाण्याच्या शुद्धतेवरच प्रश्चचिन्ह निर्माण होत आहे. या केंद्रातून अर्धप्रमाणित पाणी येत असल्याने वर्धेकरांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वर्धेतील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता अमृत योजनेतून ३५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. यामुळे या जीर्ण झालेल्या शुद्धीकरण केंद्राची दुरूस्ती करून नागरिकांना शुद्ध पाणी पुरविण्याची गरज व्यक्त होत आहे. आरोग्याच्या निम्म्या समस्या दूषित पाण्यामुळे उद्भवत असल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून यापूर्वीच सिद्ध झाले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरविण्याकरिता १९७२ मध्ये पवनार येथे धाम नदीवर जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. त्या काळच्या लोकसंख्येनुसार ते जलशुद्धीकरण केंद्र पुरेसे होते. आता शहराची लोकसंख्या वाढत आहे. नळ जोडण्याही वाढत आहे. यामुळे यात सुधारणा ही काळाची गरज आहे.
शुद्धीकरण केंद्रातील यंत्रसामग्री गंजली आहे. शिवाय पाणी पुरवठ्याच्या बंधाऱ्यात अनेक दिवसांपासून गाळ साचला आहे. त्याचाही उपसा झाला नाही. शुद्धीकरणानंतर ज्या पाईपद्वारे पाणी शहरातील नळांना जाते, तो पाईपही फुटला असून केंद्राच्या बाहेरच पाण्याचे डबके तयार झाले आहे. त्यातून जाणारे पाणी रोखण्याकरिता एका ठिकाणी लोखंडी क्लीप तर एका ठिकाणी चक्क ट्रकच्या टायरचा ट्यूब बांधण्यात आला आहे. यावरूनच पालिकेकडून त्याची व्यवस्था कशी राखली जाते, हे दिसून येते.
या केंद्रात चार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे प्रावधान आहे. असे असताना येथे एकही कायमस्वरूपी कर्मचारी नाही. केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर काम सुरू आहे. यातही येथे कार्यरत असलेले कर्मचारी पाण्याची शुद्धता तपासू शकतात अथवा नाही, याबाबत साशंकता आहे. वर्धा शहराला पवनार व येळाकेळी येथून पाणी येते. या दोन्ही ठिकाणची स्थिती सारखीच आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शुद्धीकरणाचा प्रश्न निर्माण होतो. यावर मार्ग काढण्याकरिता पालिकेच्यावतीने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

अमृत योजनेंतर्गत ३५ कोटी मंजूर; मात्र कामाला मुहूर्ताची प्रतीक्षा
शहर व शहराच्या आसपास असलेल्या परिसराच्या विकासासाठी केंद्र शासनाद्वारे अमृत योजना (अटल मिशन फॉर रिजेन्यूएशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्समिशन) कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत वर्धा नगर विकासासाठी ३५ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे. या निधीतून वर्धा शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करीत असलेल्या पवनार आणि येळाकेळी येथील जलशुद्धीकरणाचा विकास करण्याची गरज आहे. याकरिता समिती गठित करून कामाचे नियोजन करण्याची गरज असून नागरिकांची ही समस्या लवकरात लवकर मार्गी लागण्याकरिता हालचाली महत्त्वाच्या आहेत.

प्रत्येक नळाला लागणार मीटर
पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ नये याची जाणीव शुद्ध पाणी वापरत असलेल्या शहरातील नागरिकांना होणे गरजेचे आहे. यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांचे बांधकाम करण्यात आल्यानंतर शहरातील प्रत्येक नळाला मीटर लागणार असल्याचेही पालिका प्रशासनाद्वारे सांगण्यात येत आहे. तसेच ज्या भागात पाणी पोहोचण्यास अडचण येते, अशा काही भागांमध्ये नव्याने पाण्याच्या टाकीही बांधण्यात येणार असल्याची माहिती आहे.

टाक्यांच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह
शहरात पाणी पुरविण्याकरिता असलेल्या टाक्यांची पालिकेच्यावतीने कधी स्वच्छता करण्यात येते अथवा नाही, हा संशोधनाचा विषय आहे. या टाक्यांची पालिकेच्यावतीने आतापर्यंत किती वेळा स्वच्छता करण्यात आली, याची कुठलीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील या सातही टाक्यांमध्ये येत असलेली पाईपलाईन बऱ्याच ठिकाणी लिकेज असल्याचे दिसून आले आहे. यामुळे येणाऱ्या पाण्याच्या शुद्धीकरणाची हमी नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे आधी या टाक्यांची स्वच्छता करण्याची गरजही निर्माण झाली आहे.

‘तो’ बंधारा नेमका कुणाच्या अधिकारात?
पवनार येथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घेण्याकरिता धाम नदी पात्रात एक बंधारा बांधण्यात आला आहे. तो बंधारा गाळाणे पूरता बुजला आहे. परिणामी येथे पाणी साचत नाही. यामुळे यातील गाळ उपसणे गरजेचे झाले; मात्र तो बंधारा कुणाच्या अधिकार क्षेत्रात येतो याचा वाद सुरू झाला आहे. जिल्हा परिषद म्हणते, तो आमचा नाही तर नगर परिषद म्हणते, तो आमचा नाही. यामुळे तो बंधारा नेमका कुणाच्या अधिकारात येतो, यावर विचार करणे गरजेचे झाले आहे.

अधिकृत १३ हजार २५४ नळ जोडण्या
वर्धा शहरात असलेल्या विविध प्रभागात एकूण १३ हजार २५४ नळ जोडण्या आहेत. या जरी अधिकृत असल्या तरी अनधिकृत जोडण्या किती, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. या नळातून शहरातील घराघरात पाणी पोहोचत आहे; मात्र त्याच्या शुद्धीकरणाबाबत संभ्रम असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या व्यतिरिक्त १७० सार्वजनिक नळ आहेत. यातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक पाणी घेत असतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याच्या शुद्धतेवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

जलशुुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी शहरात पोहोचविण्याकरिता असलेला पाईप अनेक ठिकाणी फुटला आहे. त्याच्या डागडुजीकरिता पालिकेच्यावतीने त्याला एका ठिकाणी लोखंडी क्लिप लावण्यात आली आहे तर दुसऱ्या ठिकाणी ट्रकच्या टायरचा ट्युब बांधण्यात आला आहे. परिणामी, शुद्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वर्धा शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करीत असलेल्या पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्राचे अमृत योजनेतून नव्याने बांधकाम केले जाणार आहे. यासाठी पालिकेला ३५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. या जलशुद्धीकरण केंद्राचे काम सध्या कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. येथे कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे. शहरात काही ठिकाणी पाण्याच्या टाक्याही उभारण्यात येणार आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यावर प्रत्येक नळाला मिटरही लावण्यात येणार आहे.
- त्रिवेणी कुत्तरमारे, नगराध्यक्ष, वर्धा.

जलशुुद्धीकरण केंद्राच्या इमारतीला आता ४५ वर्षांचा काळ होत आहे. यामुळे सदर इमारतही आता जिर्ण झाली आहे. तिचे पिल्लरही तुटण्याच्या मार्गावर आहे. यामुळे त्याची डागडुजी करून येथे नवी इमारत उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Water from Wardhaarar to the Expiry Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.