जलसंकट असतानाही पाण्याचा अपव्यय
By Admin | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:36+5:302016-04-03T03:51:36+5:30
वाढत्या तापमानासोबत पाण्याची टंचाई सुद्धा वाढत आहे, असे असतानाही कारंजा शहरात, काही भागात पाण्याचा अपव्यय होत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्यावरून वाहताहेत पाण्याचे पाट
कारंजा (घा.) : वाढत्या तापमानासोबत पाण्याची टंचाई सुद्धा वाढत आहे, असे असतानाही कारंजा शहरात, काही भागात पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे नगर पंचायत प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
शहरातील गोळीबार चौकाच्या पलिकडे दाभा रस्त्यावर सतत पाण्याचे डबके साचलेले असतात. या परिसरात विठ्ठल मंदिराच्या टेकडीवर पाणी पुरवठ्याची टाकी आहे. ही टाकी बरेचदा पाण्याने पूर्ण भरून ओव्हर फ्लो होते. पण ती बंद केली जात नाही. पाण्याचा प्रवाह बंद करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नेहमीच याकडे दुर्लक्ष होते. परिणामी पाणी रस्त्यावरून वाहात चौकात जमा होते. वाहतुकीस यामुळे अडथळा होतो. तसेच अपघाताची शक्यताही यामुळे बळावली आहे. गावात जाणाऱ्या रस्त्यावर एका व्यक्तीच्या घरातील कुपनलिकेचे पाणी सतत वाहत असते. रस्त्याच्या बाजुला नाली नसल्यामुळे ते पाणी रस्त्यावर पसरते. कारंजात दर एक दिवसाआड नळाला पाणी येते. काही भागात सदोष यंत्रणेमुळे पाणी पोहचत नाही. पाणी योजनेची विहीर ज्या खैरी धरणावर आहे त्या धरणाची पातळी झपाट्याने कमी होत असतानाही पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)