चार दिवसाआड मिळेल पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 08:48 PM2019-05-15T20:48:09+5:302019-05-15T20:49:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धा शहरातील नागरिकांना विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्याने सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या ...

Water will get four days | चार दिवसाआड मिळेल पाणी

चार दिवसाआड मिळेल पाणी

Next
ठळक मुद्देशहरवासीयांसाठी शुभवार्ता : पूर्वी व्हायचा पाच दिवसांनी पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा शहरातील नागरिकांना विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्याने सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. अशातच न.प.च्यावतीने पाच दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली. शहरातील नागरिकांची समस्या लक्षात घेता नियोजनबद्ध कार्यक्रम आखून न.प.चा पाणी पुरवठा विभाग आता काम करीत आहे. त्यामुळे वर्धा शहरातील नागरिकांना आता चार दिवसाआड स्वच्छ पाणी मिळणार आहे. पालिकेच्या या पावलामुळे शहरवासियांना दिलासा मिळणार आहे.
वर्धा शहरातील सुमारे १६ हजार कुटुंबियांना न.प. प्रशासन नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करते. धाम प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची पवनार व येळाकेळी येथून उचल केल्यानंतर सदर पाणी जलशुद्धीकरणात स्वच्छ केले जाते. त्यानंतर त्या पाण्याचा पुरवठा शहरातील १९ प्रभागातील नागरिकांना केल्या जातो.
महाकाळी येथील धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्याने आणि वर्धा पाठबंधारे विभाग महिन्यातून एकदाच या प्रकल्पातून पाणी सोडत असल्याने पूर्वी वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा न.प. प्रशासनाकडून पाच दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात होता. परंतु, पार पडलेल्या विशेष बैठकीत नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्यावर प्रभावी काम केले जाणार असल्याने वर्धेकरांना आता चार दिवसाआड स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळणार आहे.

विशेष बैठकीत ठोस निर्णय
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाच दिवसाआड पाणी पुरवठा केल्यानंतर वर्धा न.प.च्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची विशेष बैठक पालिका कार्यालयात पार पडली. यावेळी न.प.च्या पाणी पुरवठा विभागाचेही तज्ज्ञांसह नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे आदींची उपस्थिती होती. यावेळी नागरिकांना पाणी देण्याच्या पाच दिवसात कशी कपात करता येते यावर सविस्तर आणि सर्व बाजूंनी चर्चा झाली. याच चर्चेदरम्यान ठोस निर्णय घेण्यात आल्याने आता वर्धेकरांना चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जाणार आहे.

वर्धा नगरपरिषदेकडे सात जलकुंभ
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या तुलनेत वर्धा नगर परिषदेची पाणी साठवण क्षमता कमी आहे. स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याची साठवणूक करण्यासाठी सध्यास्थितीत वर्धा न.प.कडे सात जलकुंभ आहेत. असे असले तरी त्यापैकी पाच जलकुंभच कामात आणले जात आहे. तर उर्वरित दोन जलकुंभापैकी महावीर उद्यानातील एक जलकुंभ जीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याचा पाहिजे तसा वापर केल्या जात नाही. तर लालालचपत रॉय शाळे शेजारील जलकुंभ नवीन असला तरी त्याच भागातील काही जलवाहिनी जीर्ण झाली असल्याने या जलकुंभाचा वापर करून नागरिकांना पाणी पुरवठा करणे पालिकेसाठी अडचणीचेच ठरत आहे. गत वर्षी १३ एप्रिलला याच जलकुंभातील पाणी सोडल्यानंतर तब्बल १३ ठिकाणी जलवाहिनी फुटली होती, हे विशेष.

टँकरमुक्तीकडे वाटचाल
पवनार येथून वर्धेच्या दिशेने येणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने जलवाहिनी दुरूस्तीच्या कालावधीत वर्धा शहरातील काही भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.
शिवाय पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने अनेक भागातील नागरिकांकडून टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी होत होती. त्यावर प्रभावी उपाय ‘चार दिवसाआड होणारा पाणी पुरवठा’ हा ठरणार असल्याचा विश्वास न.प.च्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

रविवारी झाला श्रीगणेशा
वर्धा शहरातील नागरिकांना आता न.प. प्रशासन पाच दिवसा आड ऐवजी चार दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहे.
या नवीन निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून करण्यात आली आहे.
पालिकेचा हा निर्णय पाणी टंचाईच्या झळा सोसणाºयांना दिलासा देणाराच आहे.

Web Title: Water will get four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.