वनविभागाच्या कामांनी शिवार झाले जलयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:09 AM2018-07-30T00:09:22+5:302018-07-30T00:10:12+5:30
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तळेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने केलेली नाला खोलीकरण कामे यशस्वी ठरली आहे. या नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी सोय झाली आहे.
अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तळेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने केलेली नाला खोलीकरण कामे यशस्वी ठरली आहे. या नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी सोय झाली आहे.
पांजराबंगला, जसापूर, किन्हाळा, आजनडोह येथील नाल्यांना भरपूर पाणीसाठा संचयीत झाला आहे. जंगलात वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत होते. याची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. टाले यांनी वरिष्ठांना प्रस्ताव पाठवून कामे उपलब्ध करून सुरू केली. यावर्षी २७ रुपये घनमीटर एवढा कमी दर असल्याने अनेक ठिकाणी निविदा होवूनही कामे प्रलंबित होती. मात्र तळेगाव वनविभाग यामध्ये यशस्वी ठरला. विविध निविदाधारक एजंसीला वनाधिकारी टाले यांनी गळ घालीत वन्यप्राण्यांसाठी ना नफा ना तोटा या धर्तीवर कामे करा असे आवाहन केले होते.
त्यांच्या हाकेला ओ देत पोकलँड धारकांनी नाला खोलीकरण कामे करून दिली. त्यामुळे महिनाभरात झालेल्या पावसाचे पाणी यात साचले. सध्या नाल्याच्या काठावर दररोज सकाळी बिबट, हरिण, ससे, रोही, रानडुक्कर यासह विविध प्राणी पाणी पिण्यासाठी हजेरी लावत आहे. प्राण्यांना पाणी मिळाले असल्याचे समाधान टाले यांनी व्यक्त केले. यासोबतच वनतलाव सलग समतल चर, टिसीएम कामेही विविध बिटमधील मौजात करण्यात आल्याने जमिनीत पावसाचे पाणी मुरण्यास मदत झाली आहे.
यासह क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक, कर्मचारी, वनमजूर यांनी परिश्रम घेतले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू नुकतीच पाहणी करून गेली आहे. याच धर्तीवर इतरही ठिकाणी जलयुक्तची कामे यशस्वी करण्याचे वनविभागाने ठरविले आहे.
शासनाने दिलेल्या निधीचा योग्य मार्गाने वापर करून नाला खोलीकरणासारखी कामे पूर्ण झाली आहे. वन्यप्राण्यांसाठी चांगली सोय झाली आहे.
डी.एस.टाले, वनपरिक्षेत्र अधिकारी, तळेगाव (श्या.पंत.)