रब्बी हंगामात पाणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:42 PM2018-10-11T22:42:30+5:302018-10-11T22:42:59+5:30
निसर्गाच्या लहरीपणा आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवून सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. सोयाबीनची मळणी करुन रब्बी हंगामात आता गहू व चना पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. परंतु यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे जलाशयांची पातळी खालावल्याने महाकाळी धरणात केवळ ३८ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.
श्रीकांत तोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : निसर्गाच्या लहरीपणा आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवून सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. सोयाबीनची मळणी करुन रब्बी हंगामात आता गहू व चना पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. परंतु यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे जलाशयांची पातळी खालावल्याने महाकाळी धरणात केवळ ३८ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. म्हणूनच रब्बी हंगामाकरिता या धरणातून धामच्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यासाठी सिंचन विभागाने असमर्थता दर्शविली आहे. परिणामी या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या असंख्य शेतकºयांच्या रब्बी उत्पन्नावर पाणी फेरले आहे.
महाकाळी धरणाच्या धाम नदी कालवा क्षेत्रामध्ये येळाकेळी ते शिरपूर या दरम्यान महाकाळ, मोधापूर, पवनार, केदारवाडी, कुटकी, खरांगणा (गोडे), करंजी (काजी), करंजी (भोगे) या गावांचा समावेश आहे. या परिसरातील जवळपास ४ हजार ५०० हेक्टर जमिन कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. यात खरीप आणि रब्बी पिकांचाही समावेश आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ७७ टक्केच पाऊस झाल्याने पावसाच्या खंडामुळे सोयाबीन पिक धोक्यात आले. पावसाअभावी सोयाबीनचे उत्पन्न ५ क्विंटलच्या आत आले आहे. या पिकांची भरपाई गहू व चना या पिकांतून भरुन निघेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. परंतु धरणात ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यातील १५ टक्के पाणी हे संरक्षित ठेवल्या जाते तर उर्वरीत २३ टक्के पाण्यातून पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देण्यात येते. याच धरणावरुन वर्धा शहरासह लगतच्या अकरा ग्रामपंचायतला पाणी पुरवठा केल्या जातो.त्यामुळे सिंचन विभागाने पाणी सोडण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले.
सिंचनाला फाटा, बागायतदार अडचणीत
कालव्याचे पाणी आधी पिण्यासाठी, सिंचनासाठी व नंतर औद्योगिकरणासाठी अशा प्राधान्याक्रमाने द्यायचे असते. परंतु जेव्हा जलसाठा कमी असतो तेव्हा मात्र सिंचनालाच फाटा दिला जातो. नदीवरील लिफ्ट ईरिगेशनद्वारे शेतीला मिळणारे पाणीही बंद केले जाऊ शकते. या धरणातून वर्धा नगर परिषद, एमआयडीसी, वर्धा उत्तम गल्वा कंपनीला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नदीला बंधारे बांधून पाणी अडविल्यामुळे नदीला पाणी असते. नदी शेजारी असलेल्या शेतकºयांनी नदीवरुन पाईप लाईन टाकून सिंचनाकरिता पाणी घेतलेले आहे. ३ हजार हेक्टर क्षेत्राला लिफ्ट ईरिगेशनद्वारे पाणी पुरवठा होतो. परंतु वीज वितरणमार्फत त्यांचा वीज पुरवठा बंद केला जाण्याची शक्यता असल्याने आता केळी, ऊस व फळबागायदार शेतकरीही अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.
दोन वेळा तरी पाणी सोडावे
दरवर्षी १५ दिवसांच्या अंतराने १५ नोव्हेंबर ३१ मार्च या कालावधीत सहा वेळा कालव्याला पाणी सोडले जायचे. त्यामुळे या परिसरातील शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ व्हायची. परंतु या वर्षी रब्बी हंगामासाठी पाणी देण्यास असमर्थता दर्शविली आहे.त्यामुळे यावर्षी निदान दोन वेळा जरी पाणी सोडले तरी चना,गहू व मुगासारखे पिक घेता येईल व खरीपालाही फायदा होईल. अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.
१५ नोव्हेंबरला आढावा बैठक असून त्यावेळी धरणामध्ये उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार निर्णय घेण्यात येईल. १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाण्याची आवश्यक पातळी कायम ठेवावी लागते. आजच्या परिस्थितीनुसार शेती सिंचनासाठी कालव्याला पाणी सोडण्याची शक्यता नाही. त्या बाबतीत १५ नोव्हेंबरनंतर सूचना देण्यात येईल.
रवींद्र डाफणे, सह संचालक, जलसचिंन (कालवा) पिपरी (मेघे)