धाम नदीला जलपर्णीचा विळखा
By admin | Published: June 4, 2015 01:55 AM2015-06-04T01:55:20+5:302015-06-04T01:55:20+5:30
परिसरातील गावांना धाम नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा होतो. परंतु येथील धाम नदीपात्राला जलपर्णीचा विळखा पडला आहे.
नदीपात्र दूषित : प्रवाह अवरुद्ध होत असून साठवण होते कमी
आकोली : परिसरातील गावांना धाम नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा होतो. परंतु येथील धाम नदीपात्राला जलपर्णीचा विळखा पडला आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाली असून जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत तातडीने नदीपात्र स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी आहे. जलपर्णीचा विळखा वाढतच असून यात नदीपात्रात पाण्याऐवजी झुडपेच दिसतात. त्यामुळे पाण्याच्या शद्धतेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. यात परिसरातील गावाचे सांडपाणी सोडण्यात येत आहेत. त्यामुळे जलप्रदूषण वाढले आहे.
प्रत्यक्षात पाणी दूषित होत असताना स्थानिक प्रशासन यावर कृती करीत नसल्याचे दिसते. याबाबत येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे निवेदन दिले होते. मात्र नदीपात्राच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
धाम नदीवर असलेल्या धार्मिक स्थळांमुळे या नदी तीराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ढगाभुवन, महाकाळी मंदीर, सुकळी (बाई)चे शांतीधाम येथे यात्रा भरते. खरांगणा पासून पुढे आंजी, सुकळी, येळाकेळी येथील नदीपात्र जलपर्णी व शेवाळाने झाकले गेले आहे. नदीपात्रात जिथे पाणी साचले आहे तिथे बेशरमचे झाड वाढले आहे. येथूनच पाणीपुरवठा करणारी नळयोजना असल्याने आरोग्याचा प्रश्न भेडसावतो. जलपर्णीमुळे नदीचा प्रवाह अवरुद्ध झाला असून पावसाळ्यात पाणी शेतात शिरते. त्यामुळे जलपर्णी साफ करण्याची गरज परिसरातील शेतकरी व्यक्त करतात.(वार्ताहर)