पिके कोमेजण्याच्या मार्गावर
By admin | Published: August 28, 2016 12:38 AM2016-08-28T00:38:52+5:302016-08-28T00:38:52+5:30
२० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेकडो एकर जमिनीतील सोयाबीन, कपाशी
पावसाची प्रतीक्षा : कपाशी, तूर, सोयाबीन पिकांना फटका
पिंपळखुटा : २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेकडो एकर जमिनीतील सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी ही पिके धोक्यात आली आहे. सोयाबीनचे पीक तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतु एका पावसासाठी सोयाबीनचे पीक जाणार की काय अशी धास्ती शेतकरी वर्गाला आहे. परिसरातील पिंपळखुटा, वाढोणा, गुमगाव, तरोडा, बोथली, किन्हाळा, चांदणी, तळेगाव येथील शेतकरी पावसाअभावी पुरते हैराण झाले आहे.
परिसरातील जमीन मध्यम व हलकी आहे. त्यामुळे पावसाचा ताण सहन करू शकत नाही. मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे पीक कोमजले आहे. ज्वारीवरही परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे. काही ठिकाणी ओलीताची सोय आहे. परंतु अनेक तांत्रिक व आर्थिक अडचणीस्तव शेतकरी सिंचन करू शकत नाही.
यंदा सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची वाढ उत्तम झाली, पण आता फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेतच पाऊस नसल्याने तोंडचे पीक जाणार की काय यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहे. यातच पिकावर किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. पावसाअभावी खत देण्याची प्रक्रिया थांबली आहे. त्यातच मजुरीचे दरही वाढले असून शेतकरी चिंतातूर झाले आहे.(वार्ताहर)