१५ दिवसांच्या फरकामुुळे वर्धेकरांना अतिरिक्त चटक्यांची शक्यता
By Admin | Published: April 17, 2017 12:34 AM2017-04-17T00:34:22+5:302017-04-17T00:34:22+5:30
मागील पाच वर्षांपासून वर्धेचा पारा ४६ ते ४७ अंशांच्या घरातच राहिला आहे. आगडोंब उठविणाऱ्या या पाऱ्याचे चटके वर्धेकरांनी सहन केले आहेत.
उष्ण लहरींमुळे आणखी तीन दिवस काहिली : पाच वर्षांतील तापमानाच्या तुलनेत पहिल्या पंधरवड्यातच पारा ४५ अंशांवर
रूपेश खैरी वर्धा
मागील पाच वर्षांपासून वर्धेचा पारा ४६ ते ४७ अंशांच्या घरातच राहिला आहे. आगडोंब उठविणाऱ्या या पाऱ्याचे चटके वर्धेकरांनी सहन केले आहेत. गेल्या पाच वर्षांत वर्धेत एप्रिलच्या अखेरीस नोंद होणारे तापमान यंदा महिन्याच्या मध्यंतरावरच ४५ अंश इतके नोंदविले गेले. एप्रिल महिन्यात पारा एवढा चढला नाही, असे नाही. फरक फक्त १५ दिवसांचा पडला. १५ दिवसांपूर्वीच चढलेल्या या पाऱ्यामुळे वर्धेकरांवर यंदा ४८ अंशांचे चटके सहन करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात तीन दिवसांत उष्णतेची लाट असल्याने चटके जाणवणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिले आहे. यामुळे हे चटके कायम राहणार आहेत. यंदा उष्णतेची लाट असली तरी एप्रिल महिन्यात वर्धेकरांनी आज असलेल्या उन्हाचे चटके अशी लाट नसतानाही सोसले आहे. वर्धेत सर्वांधिक नोंद दोन वर्षांत झाली आहे. मे १३ व १५ या वर्षांत वर्धेत पारा ४७.५ अंशावर नोंदविला गेला. विशेष म्हणजे दोन्ही वर्षी या तापमानाची तारीख २१ मेच होती. यंदा उष्णतेची लाट असल्याने पारा चढला, हे मान्य असले तरी इतर वर्षी एवढे तापमान वाढण्याच्या कारणाचा विचार वर्धेत होणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ २०१४ आणि २०१६ या वर्षांत पारा ४६ अंशांवर राहिल्याचे दिसून आले.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही उष्णतेची लाट तयार झाल्याचे येथील वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले आहे. ही लाट गुजरात ते ओडीसापर्यंत असल्याने तिचे चटके मराठवाडा, विदर्भ आणि मध्यप्रदेशातही जाणवत आहे. यात विदर्भ त्यातही वर्धा मध्यभागी येत असल्याने हे चटके येथे इतर जिल्ह्याच्या तुलनेत अधिक जाणवत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या उन्हाळ्यात प्रारंभीच पारा ४५ अंशांवर असल्याने मे महिन्यात पारा वर्धेत नवा उच्चांक स्थापित करेल, असे संकेत वर्धेच्या वेधशाळेतील तज्ज्ञांनी दिले आहेत.
किमान तापमानातील वाढ कायम
शहरात कमाल तापमानासोबत किमान तापमानही वाढत आहे. यामुळे सायंकाळी सूर्यास्तानंतर निर्माण होणारा गारवा अनुभवायला मिळत नाही. जिल्ह्यात कमाल तापमानात जरी कमी-अधिक अंशांचा फरक दिसत असला तरी किमान तापमानात मात्र त्याचा विशेष फरक जाणवत नसल्याचे दिसून आले आहे. निसर्गाच्या नियमानुसार कमाल तापमानाच्या निम्म्यावर किमान तापमान असावे; पण येथे हे किमान तापमान कमाल तापमानाच्या जवळच असल्याचे दिसत आहे.