हमे शौक नही...सबकूछ परिस्थिती सिखाती है साहाब...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:49 PM2018-11-13T23:49:28+5:302018-11-13T23:50:58+5:30
बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानुसार विविध सामाजिक संस्था कामही करीत आहे. परंतू तरीही अनेक बालकांचा दिवस हातात भिक्षापात्र घेऊन उगवतो आणि मावळतोही.
सचिन देवतळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानुसार विविध सामाजिक संस्था कामही करीत आहे. परंतू तरीही अनेक बालकांचा दिवस हातात भिक्षापात्र घेऊन उगवतो आणि मावळतोही. कचऱ्यातून आपल्या आयुष्याचा शोध घेणारेही आपल्याला गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पहावयास मिळतात. समाजही सुशिक्षीततेचा आव आणून त्यांना धुडकावून लावतात. अनवाणी पाय आणि अर्ध झाकलेल्या शरीराने फिरत असणाऱ्या बालकांना त्यांच्या या आयुष्याबाबत विचारले तर ‘हमे शौक नही...सबकूछ परिस्थिती शिखाती है साहाब...!’ अशी केविलवानी व्यथा ते मांडतात. त्यांचे हेच शब्द कानावर पडताच अंगावर काटा उभा होतो. तेव्हा दरवर्षी बालकदिन साजरा करतो तरीही या मुलांवर कुणाचे लक्ष का पडले नाही? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. कुटुंबातील अठरा विश्वे दारिद्र्य बालकांना हाती भिक्षापात्र घ्यायला भाग पाडतात.
शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच गल्लीबोळात ही मुले भीक मागून जीवन जगत आहे. हातात पाठ्यपुस्तक घेण्याऐवजी भिक्षापात्र आल्याने खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर पोटाचा प्रश्न थोपविला गेला आहे.
उन्हाचे चटके, हवेचा मारा आणि थंडीचा गारठा झेलत उघड्यावर जीवन जगणाºया या गोंडस बालकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ८ ते १२ वर्ष वयोगटातील ही कोवळी मुलं पोट भरण्याची सोय करण्यासाठी लग्न समारंभ किंवा हॉटेलमधील उष्टे अन्न खाऊन जगतात. उघड्यावरचे जीवन जगणाऱ्या चिमुल्यांना शरिराच्या स्वच्छतेचेही भान राहत नाही. परिणामी अनेक आजारांची लागणही त्यांना होते. शिवाय कुणाचाही वचक व धाक नसल्याने ही मुले व्यसनाधीनतेकडे आणि नंतर गुन्हेगारीकडे वळतात; पण या धकाधकीच्या आभासी जगात त्या बेघर असलेल्या चिमुकल्यांप्रती समाजमनही निष्ठूर झाल्याचे दिसून येत आहे.
उपचाराची वानवा असल्याने या बालकांना ताप, खोकला, हातापायावर सुजन तसेच कावीळ सारखे आजार असल्याचेही एका पाहणीतून निदर्शनास आले आहे. अशा बिकट परिस्थित मिळेल ते काम करुन दिशाहीन जीवन जगत आहे. त्यांना शिक्षणाचा गंध नसल्याने शिक्षणाचा अ,ब,क,ड ही माहीत नाही. त्यामुळे देशाची भावी पिढी बालकांमध्ये पाहणाºया या समाजाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. या बालकांना जगण्याचा मार्ग दाखविला तरच खºया अर्थाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या विचारातील ‘बालक दिन’ साजरा होईल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.