प्रचारतोफा थंडावणार, मतांची जुळवाजुवळ सुरू
By admin | Published: October 12, 2014 11:47 PM2014-10-12T23:47:04+5:302014-10-12T23:47:04+5:30
सोमवारी प्रचारतोफा थंडावणार आहे. दरम्यानच्या काळात कोणत्या उमेदवाराने नागरिकांवर छाप पाडली. याची गणिते जुळविणे सुरू झाले आहे. वर्धा, आर्वी, हिंगणघाट आणि देवळी विधानसभा मतदार संघात
राजेश भोजेकर - वर्धा
सोमवारी प्रचारतोफा थंडावणार आहे. दरम्यानच्या काळात कोणत्या उमेदवाराने नागरिकांवर छाप पाडली. याची गणिते जुळविणे सुरू झाले आहे. वर्धा, आर्वी, हिंगणघाट आणि देवळी विधानसभा मतदार संघात एकूण ६९ उमेदवार रिंगणात आहे.
प्रत्येकाने आपापल्या परीने प्रचाराला गती दिली. प्रमुख राजकीय पक्ष कॉँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना, मनसे, बसपा उमेदवारांमध्ये प्रचारातही चांगली चुरस बघायला मिळाली. आर्वी आणि वर्धा मतदार संघात काही अपक्षांनीही प्रचारात चुरस निर्माण केल्याचे दिसून आले. कोणाचे पारडे जड, कोण कोणाला पटकणी देईल, कोणामुळे कोणाच्या मतांचे विभाजन होईल, कुणाला फायदा होईल, याचा सारीपाट मांडणे सुरू झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये प्रचारातील चुरशीमुळे मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले. यासोबतच विविध राजकीय नेत्यांच्या सभा आणि त्यातून आरोप प्रत्यारोपांचे फडही रंगले. यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकील रंग चढला होता. या प्रचाराच्या रणधुमाळीत १३ दिवस कसे पालटले हे कळले सुध्दा नाही. काही उमेदवारांनी सिनेकलावंताना प्रचारात आणून जनतेचे मनोरंजन केले. ‘यांनाच बहुमताने विजयी करा’ हा आवाज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ऐकायला येत होता. ही रणधुमाळी सोमवारी थांबणार आहे. निवडणुकीच्या वातावरण निर्मितीत भर टाकणारे विविध राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांचे प्रचार फलक काढले जाणार आहेत. निष्पक्षपणे व शांततापूर्ण वातावरणात निवडणूक व्हावी, या अनुषंगाने शासकीय यंत्रणा कामात गती घेणार आहे. मतदार राजाला निवडणुकांमध्ये सर्वोच्च स्थान असते. एकेका मताचे महत्त्व उमेदवाराला वाटू लागते, हे अमुल्य मत देण्याचा दिवस आता काही तासांवर येऊन ठेपला आहे.
वर्धेत तिरंगी लढतीचे चित्र
गत १३ दिवसांपासून वर्धा मतदार संघात प्रचारात कमालीचे चढउतार बघायला मिळाले. जस जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे. तसतशी निवडणुकीला रंगत येत आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असली तरी शिवसेना, बसपा आणि इतरही राजकीय पक्ष प्रचारात सातत्य ठेवून आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान अपक्ष आमदार रिंगणात आहेत, तर काँग्रेसने पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते प्रमोद शेंडे यांच्या मुलावर बाजी लावली आहे. सेलू तालुक्यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. इतर राजकीय पक्ष शहरी भागातच प्रभावी प्रचार करताना दिसून आले. मनसे, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन मुक्ती पार्टी हे पक्ष मतांची विभाजन करणार असे दिसून येते. एकूणच राजकीय पार्श्वभूमी विचारात घेता मतदार संघात अंतिम सामना भाजप, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमध्ये होणार असे चित्र आहे.