ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 82,685 व्यक्ती ठरतील कमकुवत दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 05:00 AM2021-12-20T05:00:00+5:302021-12-20T05:00:12+5:30
जिल्ह्यात सध्या ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसला तरी काेविड व्हॅक्सिन हाच सध्यातरी खबरदारीचा एकमेव प्रभावी उपाय आहे. ओमायक्रॉनशी लढा देण्यासाठी प्रतिबंधात्मक लस कितपत प्रभावी राहतील यावर सध्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यास करीत असून नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बूस्टर डोस द्यावा लागेल, असे काही तज्ज्ञ सांगतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविडच्या डेल्टा प्रकारापेक्षा ओमायक्रॉन या प्रकराचा झपाट्यानेच प्रसार होतो. इतकेच नव्हे तर कोविडची तिसरी लाट ओमायक्रॉनमुळेच जिल्ह्यासह देशावर ओढावण्याची शक्यता आहे. अशातच कोविडची तिसरी लाट ओढावण्यापूर्वी वर्धा जिल्हा १०० टक्के व्हॅक्सिनेट होणे गरजेचे असून ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यावर कोविडची तिसरी लाट ओढावल्यास कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेले जिल्ह्यातील तब्बल ८२ हजार ६८५ व्यक्ती कोविडशी लढा देताना कमकुवत दुवा ठरतील.
जिल्ह्यात सध्या ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसला तरी काेविड व्हॅक्सिन हाच सध्यातरी खबरदारीचा एकमेव प्रभावी उपाय आहे. ओमायक्रॉनशी लढा देण्यासाठी प्रतिबंधात्मक लस कितपत प्रभावी राहतील यावर सध्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यास करीत असून नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बूस्टर डोस द्यावा लागेल, असे काही तज्ज्ञ सांगतात. पण केंद्रीय टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी ओमायक्रॉनशी लढा देताना कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेले व्यक्ती कोविड लढ्यात कमकुवत दुवा ठरतील असे स्पष्ट केले आहे. वर्धा जिल्ह्यातील तब्बल ८२ हजार ६८५ व्यक्तींनी आतापर्यंत कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हेच व्यक्ती कोविडच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तीत प्रकाराशी लढा देताना कमकुवत दुवा ठरणार आहेत. सध्याच्या कोविड संकट काळात जिल्ह्यातील हाच कमकुवत दुवा लवकरात लवकर १०० टक्के व्हॅक्सिनेट व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष पाऊल उचलण्याची तसेच कोरोनाची लस न घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीने नजीकच्या केंद्रावर जावून कोविडची व्हॅक्सिन घेण्याची गरज आहे.
१ लाख ७६ हजार व्यक्तींची दुसरा डोस कडे पाठ
- कोरोना संकटाच्या काळात लस ही कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला पूर्णपणे व्हॅक्सिनेट म्हटले जाते; परंतु अद्यापही जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार १७ व्यक्तींनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.