हे घ्या... आता तर लग्नाची पंगतही महागली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 04:04 PM2021-11-22T16:04:55+5:302021-11-22T16:17:22+5:30
कोरोना स्थिती सुधारत असल्याने लग्नाची बडी मेजवानी देण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे; मात्र कोरोनानंतर लग्न समारंभातील खर्चातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वर्धा : तुळशी विवाहानंतर आता सर्वत्र लग्नाचा बार उडणार असला, तरी महागाईमुळे जेवणाच्या पंगतीचा खर्च वाढणार आहे. गेल्या दोन वर्षात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसह खाद्यपदार्थांचे दर वाढल्याने आता कॅटरर्सनीदेखील ताटाची किंमत वाढविली आहे. त्यामुळे आता लग्नाचा खर्च काढताना पंगतीसाठी जास्तीचे बजेट काढून ठेवावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळी आणि तुळशी विवाह झाले की, लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. विवाह सोहळ्यांचा धूमधडाका जुलैपर्यंत सुरू असतो. गेले दीड वर्षे कोरोना काळात २० व्यक्तींना परवानगी देण्यात आल्याने लग्न सोहळे थोडक्यात आणि कमी खर्चात आटोपण्याची वेळ आली होती; पण आता कोरोना स्थिती सुधारत असल्याने लग्नाची बडी मेजवानी देण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे; मात्र कोरोनानंतर लग्न समारंभातील खर्चातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोना काळात उत्पादन आणि व्यावसायावर परिणाम झाल्याने महागाईत वाढ झाली आहे. यात स्वयंपाकाचा गॅस महागल्याने तसेच अन्नधान्याच्या किमती वाढल्याने हॉटेल व्यावसायिक आणि आहार आयोजक अर्थात कॅटरर्स यांनी जेवणाचे ताट महागण्याचे संकेत दिले आहेत. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. इंधनदरात वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत.
बजेटमध्ये वाढ
अनेकांची लग्नाची तयारी सुरू झाली आहे. तारखा ठरल्या आहेत, तर काहींची तब्बल दोन वर्षांनंतर लग्नाची जुळवाजुळव सुरू आहे. कोरोना काळात अनेकांनी थाटामाटात लग्न करण्याची इच्छा मागे ठेवून साध्यात लग्न आटोपले. आता ज्यांना लग्नबेडीत अडकायचे आहे, त्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांत शिथिलता आल्याने लग्नाचा मोठ्याने बार उडवून देण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. कोरोना काळात पंगतीचा खर्च काही लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे; मात्र काहींनी लग्नाचा मोठा खर्च साधण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे.
दरवाढ अशी...
गॅस सिलिंडर ९९०
हरभरा डाळ ८० रुपये
पेट्रोल ११० रुपये.
भाजीपाला ८० रुपये.