भारनियमनाने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:32 AM2017-09-18T00:32:20+5:302017-09-18T00:32:38+5:30
विद्युत निर्मितीचा वेग मंदावताच महावितरणने जिल्ह्यात भारनियमनाचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भारनियमन तथा अवेळी वीज खंडित केली जात असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विद्युत निर्मितीचा वेग मंदावताच महावितरणने जिल्ह्यात भारनियमनाचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भारनियमन तथा अवेळी वीज खंडित केली जात असल्याचे चित्र आहे. शहरांमध्ये अद्याप भारनियमन सुरू झाले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी ‘इमर्जंसी’च्या नावावर वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.
काही दिवसांत कोळशाचा पुरवठा थांबल्याने वीज निर्मितीवर विपरित परिणाम झाला. यामुळे महावितरणद्वारे लगेच ग्रामीण भागात भारनियमनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. सकाळ, दुपार व सायंकाळ अशा तीन वेळात महावितरणकडून भारनियमन केले जात असल्याची ओरड ग्रामस्थांतून होत आहे. यामुळे ओलिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात सकाळी तीन तास, दुपारी वा रात्री तीन तास, असे भारनियमनाचे वेळापत्रक आहे; पण या व्यतिरिक्त अन्य वेळीही वीज पुरवठा खंडित केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. शहरांसाठी सध्या भारनियमन नाही, असे विद्युत कार्यालयांकडून सांगितले जात आहे. असे असले तरी दिवसातून एक-दोन वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याशिवाय राहत नाही. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
भारनियमन त्वरित बंद करा; व्यापारी संघटनेची मागणी
आष्टी (शहीद) : शहरासह तालुक्यात दुपारी व रात्रीच्या वेळी प्रत्येकी तीन तास सक्तीचे भारनियमन केले जात आहे. याविरूद्ध आष्टी तालुका व्यापारी संघाने महावितरणच्या सहायक अभियंत्याला निवेदन देण्यात आले. यात त्वरित भारनियमन न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
शहरात मागील १५ दिवसांपासून सतत भारनियमन सुरू आहे. सकाळी ३ तास, कधी दुपारी ३ तास तर रात्रीला ३ तास वीज खंडित केली जाते. सायंकाळी ५.१५ ते ८.१५ ही वेळ व्यापाºयांची व्यवसायाची वेळ असते. याच वेळेत भारनियमन केले जात असल्याने नुकसान होत आहे. आष्टीत कुठलाही मोठा उद्योग व व्यवसाय नाही. यामुळे व्यापारी आधीच अडचणीत आले आहेत. त्यात आता विजेचे नवीन संकट उभे ठाकले आहे. ही वेळ त्वरित बदलण्यात यावी, शहरात भारनियमन बंद करावे, अन्यथा वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यापारी संघाने दिला आहे. निवेदन देताना संघाचे अध्यक्ष अशोक विजयकर, उपाध्यक्ष अता खान, संजय शिरभाते, सचिव पवन अग्रवाल, शफी अहमद, प्रदीप गुप्ता, नरेश भार्गव, राजेश ठाकरे, धिरज वाडेकर, सागर सिनकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.