महाजनादेश यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:16 PM2019-08-02T23:16:09+5:302019-08-02T23:16:58+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीतून सकारात्मक ऊर्जा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी नागपूरच्या दिशेने रवाना झाली. या महाजनादेश यात्रेचे सेलू, केळझर आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीतून सकारात्मक ऊर्जा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी नागपूरच्या दिशेने रवाना झाली. या महाजनादेश यात्रेचे सेलू, केळझर आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवनार, सेलू आणि केळझरवासीयांशी संवाद साधून त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा पाढाच वाचला. शिवाय पुन्हा एकदा भाजप सरकारला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना निवडून देण्याचे आवाहनही केले.
पवनार आणि सेवाग्राम आश्रमाकडे पाठ
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रम येथूनच स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली. तर पवनार येथून आचार्य विनोबा भावे यांनी भूदानयज्ञ चळवळ राबविली. त्यामुळे या दोन्ही स्थानांना अतिशय महत्त्व आहे. परंतु, महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने वर्धेत मुक्कामी राहिलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या आपल्या दौऱ्यात पवनार आणि सेवाग्राम आश्रमात जाण्याचे टाळले.
विशेष म्हणजे यंदाचे वर्ष महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष म्हणून भारतासह संपूर्ण जगात साजरे केले जात आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या यंदाच्या वर्धा येथील दौºयात या दोन्ही ठिकाणी जाण्याचे नियोजित नसल्याचे दिसून आले.
पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येतो
केळझर : जशी मागील पाच वर्षे तुमची सेवा करण्याची मला संधी दिली. तशीच संधी पुढेही द्याल. यंदा तुम्ही माझ्यासाठी सिद्धीविनायकाकडे आशीर्वाद मागा. केळझर हे माझे दत्तक गाव आहे हे मी विसरलो नाही. त्यामुळे केळझरचा विकास करण्याच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी आवश्यक आहे, त्या आपण यापूर्वी देखील केल्या आहेत आणि भविष्यात देखील करू. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर थेट केळझरला येतो. शिवाय सिद्धीविनायकाचे दर्शन घेतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास केळझर येथे दाखल झाली. ग्रामस्थांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते केळझरवासीसांशी संवाद साधताना बोलत होते. पाचवर्षे आम्हाला जसा जनादेश दिली आता पुन्हा एकदा जनादेश द्या असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. याप्रसंगी खा. रामदास तडस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. पंकज भोयर आदींची उपस्थिती होती. त्यानंतर केळझरवरून ही महाजनादेश यात्रा नागपूरच्या दिशेने रवाना झाली.
मुख्यमंत्री फडणवीस हे सेवाग्राम आश्रमात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आश्रमात त्यांचे परंपरेप्रमाणे स्वागत करण्यात येणार होते. तशी तयारीही पूर्ण झाली होती. शिवाय बापूकुटीत प्रार्थना करण्याचीही तयार करण्यात आली होती. मात्र, नंतर निरोप मिळाला की ते पवनार मार्ग पुढील प्रवासाकरिता निधाले आहे. शिवाय ते सेवाग्राम आश्रमात येणार नाही.
- मुकुंद मस्के, मंत्री, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम.
रोहण्यात भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार
रोहणा : महाजनादेश यात्रेचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रोहण्यात रोहणा सर्कल प्रमुख राजेश हिवसे यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
आर्वीवरून पुलगावला जाताना मुख्यमंत्र्यांनी ५ मिनिटे रोहण्यात थांबून रोहणावासीयांचे स्वागत स्वीकारले.
यावेळी माजी जि.प. सदस्य हितेंद्र बोबडे, आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पावडे, माजी सैनिक प्रभाकर बोबडे, राजेंद्र कोहळे, सुनील बोंदरे, संजय बोंदरे, प्रकाश टाकळे, रमेश टाकळे, अशोक निकम आदींची उपस्थिती होती.