स्वागतम्...! उशिरा का होईना, पण आपण आलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 05:00 AM2020-12-16T05:00:00+5:302020-12-16T05:00:10+5:30

जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व विभागाची पाहणी करुन मस्टर ताब्यात घेत तपासणी केली. यामध्ये शिक्षण विभाग प्राथमिकमध्ये धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या विभागामध्ये २९ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून यापैकी तीनच कर्मचारी वेळेवर उपस्थित झाले होते तर तब्बल सहा कर्मचाऱ्यांनी मंगळवारची स्वाक्षरी सोमवारीच केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सहायक  प्रशासन अधिकाऱ्यासह कार्यालय अधीक्षक  व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Welcome ...! Why not late, but you're here | स्वागतम्...! उशिरा का होईना, पण आपण आलात

स्वागतम्...! उशिरा का होईना, पण आपण आलात

Next
ठळक मुद्देलेटलतीफ कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत : मिनिमंत्रालयातील पदाधिकाऱ्यांची अशीही ‘गांधीगिरी’

  लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पाच दिवसाचा आठवडा झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्येही बदल केला आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनीच वेळ अंगवळणी पडली आहे. त्यामुळे कार्यालयात येण्यासाठी नेहमीच उशिर होत असल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्य प्रवेशव्दारावर उपस्थित राहून हजेरी घेतली. यादरम्यान तब्बल २०५ अधिकारी व कर्मचारी उशिराने आल्याचे निदर्शनास आले. त्या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. 
दिवाळी आटोपून महिना झाला तरीही जि.प.तील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खूर्च्या रित्याच दिसतात. कर्मचारी कधी येतात, कधी जातात याचा काही ताळमेळ नाही. बहुतांश कार्यालयातील अधिकारी व विभागप्रमुख दौऱ्यांवर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कामकाजांचा खोळंबा होत आहे. याचाच अनुभव प्रत्यक्ष पदाधिकाऱ्यांना येत असल्याने मंगळवारी जि. प.  अध्यक्ष सरिता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, महिला व बालकल्याण  सभापती सरस्वती मडावी आणि शिक्षण व क्रीडा सभापती मृणाल माटे यांनी सकाळी १० वाजेपासून ११ वाजेपर्यंत मुख्यव्दारावर उपस्थित राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद घेतली. यावेळी १०.३० ते १०.५७ वाजेदरम्यान २०४ अधिकारी व कर्मचारी आल्याचे निदर्शनास आले. उशिराने येणाऱ्यां सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तर काही विभाग प्रमुख अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. या आकस्मिक पाहणीने जिल्हा परिषदेत  चांगलीच खळबळ उडाली.
 

शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा अजब कारभार
जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व विभागाची पाहणी करुन मस्टर ताब्यात घेत तपासणी केली. यामध्ये शिक्षण विभाग प्राथमिकमध्ये धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या विभागामध्ये २९ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून यापैकी तीनच कर्मचारी वेळेवर उपस्थित झाले होते तर तब्बल सहा कर्मचाऱ्यांनी मंगळवारची स्वाक्षरी सोमवारीच केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सहायक  प्रशासन अधिकाऱ्यासह कार्यालय अधीक्षक  व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षण विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

कर्मचाऱ्यांवर एका रोपट्याची तर अधिकाऱ्यांवर बागेची जबाबदारी
पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा परिषदच्या प्रवेशव्दारावर उभे राहून नोंदणी केली असता तब्बल २०४ कर्मचारी व अधिकारी कार्यालयीन वेळेपेक्षा उशिराने आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जे कर्मचारी उशिराने आलेत त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना एक कुंडी आणून त्यात रोपटं लावावे लागणार आहेत तर अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेतील दोन बगिच्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वच्छता विभागात विजेची होतेय उधळपट्टी
दुसऱ्या माळ्यावर असलेल्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी उपस्थित होते. पण, या कार्यालयातील सर्व पंखे व लाईट सुरु होते. कार्यालयातील भिंतीवर वीज बचतीचा संदेश देणारे फलक लावलेले दिसले. त्यामुळे ते फलक आणि कार्यालयातील परिस्थिती बघता, विरोधाभास दिसून आल्याने पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत आवश्यकता नसताना रिकाम्या खुर्च्यांसाठी लाईट व पंख्याची गरज का? असा प्रश्न उपस्थित करुन ते बंद करायला लावले. तसेच कार्यालयाच्या खिडक्या उघड्या केल्यास प्रकाश येऊ शकतो, असेही लक्षात आणून दिले.
 

...तर कर्मचाऱ्यांनाच करावी लागणार स्वच्छता
जिल्हा परिषदेतील सर्व विभागाला पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली. यादरम्यान अनेक ठिकाणी कार्यालयातील गॅलरीमध्ये पान आणि खर्रा खावूनट भिंतींच्या कोपऱ्यांमध्ये पिचकाऱ्या मारल्याचे चित्र दिसून आले. बांधकाम विभागाच्या कार्यालयातील गॅलरीची पाहणी केली असता महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ‘काय सांगू मॅडम, एका दिवसाला किलो भर सुपारी निघतात,’ असे सांगताच जिल्हा परिषद अध्यक्षांचा पार भडकला. ‘यापुढे कार्यालयातील स्वच्छतेची जबाबदारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आहे. पुन्हा असा प्रकार दिसला तर कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छता करावी लागेल’, अशी तंबी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिली.  

जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याबाबत तक्रारी होत्या. त्यानुसार सकाळी कार्यालयीन वेळेत किती अधिकारी व कर्मचारी येतात, याची पाहणी करण्यात आली. यावेळी तब्बल २०५ अधिकारी, कर्मचारी उशिराने आल्याचे निदर्शनास आले. त्या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उर्वरित कर्मचारी रजेवर होते की, कार्यालयात आलेच नाही. याची माहिती घेतली जाईल. 
- सरिता गाखरे,                                                 अध्यक्ष जिल्हा परिषद वर्धा. 

Web Title: Welcome ...! Why not late, but you're here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.