सव्वा कोटींच्या क्रीडा संकुलाचे वाभाडे
By admin | Published: September 14, 2016 12:40 AM2016-09-14T00:40:43+5:302016-09-14T00:40:43+5:30
क्रीडा संकुलाच्या बाहेरील मैदनाला संरक्षक भिंत नाही, क्रीडा साहित्य चोरट्यांनी लांबविले, मैदनात विजेच्या दिव्यांअभावी पसरलेला काळोख,
संरक्षण भिंत नाही : अवैध प्रकार वाढले; साहित्यही लंपास
अमोल सोटे आष्टी (शहीद)
क्रीडा संकुलाच्या बाहेरील मैदनाला संरक्षक भिंत नाही, क्रीडा साहित्य चोरट्यांनी लांबविले, मैदनात विजेच्या दिव्यांअभावी पसरलेला काळोख, माती मिश्रित मुरूमामुळे झालेला चिखल अशी काहीशी अवस्था येथील तालुका क्रीडा संकुलाची झाल्याचे ‘लोकमत’च्या आॅन दि स्पॉट रिपोर्टमधून समोर आले आहे. या क्रीडा संकुलावर थोडे थोडके नाही तर तब्बल १ कोटी २५ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे. क्रीडा संकुलाच्या या अवस्थेमुळे शासनाच्या उद्देशावर पाणी फेरल्या जात आहे.
२० हजार चौरस फुट अशा विस्तीर्ण जागेवर तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली. याठिकाणी बॅटमिंटन हॉल, टेनिस हॉल दोन्ही मिळून एकच मोठा हॉल उभारण्यात आला. याला गेट नसल्याने रात्रीला दारूडे तथा अवैध काम करणारे सर्रास पाहायला मिळतात. सुविधा अपूर्ण असल्याने खेळाडू या हॉलमध्ये खेळण्यास तयार नाही. यालाच लागून व्यायामशाळा आहे. काही खेळाडू तरुणांनी व्यायाम शाळा सुस्थितीत ठेवली आहे. कबड्डी, क्रिकेट, हॉलिबॉल खेळण्यासाठी तयार करण्यात आलेली धावपट्टी निकृष्ठ दर्जाची करण्यात आली. लाल कठीण मुरूम व त्यावर सॉफ्ट मुरूम टाकून काम करणे आवश्यक होते; मात्र थातुरमातूर काम करून शासकीय निधीचा अपव्यय केल्याचे खेळाडू सांगतात. पावसाळ्यात पाणी आल्यावर लाल मातीचा गारा होते. त्यामध्ये खेळाडूंना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
क्रीडांगणाला संरक्षण भिंत बांधून त्यावर जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी या लोखंडी अँगल व जाळ्या कापून नेल्याने मैदनाची सुरक्षा रामभरोसे आली आहे. रात्रीला सार्वजनिक दिवे नसल्याने काळाधूस अंधाराचे साम्राज्य कायम आहे. लाईट लावण्यासंबंधी संबंधित यंत्रणेला सांगण्यात आले. त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे रात्रीला खेळाडूंना सराव करायला अडचण जात आहे. रात्री फिरायला येणारे नागरिक अंधारामुळे त्रास सहन करीत असतात. क्रीडांगणाच्या प्रवेश द्वाराजवळचे संरक्षण भिंत व जाळी अर्धवट असल्यामुळे लोखंडी गेट असूनही येथे सहज आत प्रवेश करता येतो. त्यामुळे क्रीडा संकुलाची सुरक्षा कुठेही दिसत नाही. पावसाळ्याच्या पाण्याचे नियोजन म्हणून नाल्या बांधण्यात आल्या; परंतु बऱ्याच ठिकाणी पाणी वाहून जात नसल्यामुळे गेटसमोर मोठे डबके साचते.
क्रीडांगणाच्या मागील बाजुला हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय तर दुसऱ्या बाजुला लोकमान्य विद्यालय आहेत. दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी या संकुलाचा वापर होवू शकतो; परंतु सुविधा नसल्याने तालुका क्रीडा संकुल भकास अवस्थेत दिसत आहे. सव्वा कोटी रुपये खर्च करून या संकुलाची अवस्था बिकट आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे असलेले दुर्लक्षित धोरण याला खतपाणी घालण्यास कारणीभूत ठरत आहे. वरिष्ठ अधिकारी कामांची वारंवार पाहणी करीत नाही. त्यामुळे सुमार काम करणाऱ्यांचे फावत आहे. तालुका क्रीडा संकुलाची दुरूस्ती करून तात्काळ खेळाडुंना सुविधा देण्याची मागणी होत आहे.