शेतात विहीर, वीज जोडणी, मात्र व्होल्टेजच नाही; महावितरणला पत्रव्यवहार करूनही तोडगा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 05:05 PM2024-11-13T17:05:54+5:302024-11-13T17:07:20+5:30

महावितरणचा प्रताप : आंबोडा शिवारात पाच वर्षांपासून ओलित अशक्य, अनेकदा तक्रारी तरी होतेय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Well in the field, electricity connection, but no voltage; Correspondence to Mahavitran has no solution | शेतात विहीर, वीज जोडणी, मात्र व्होल्टेजच नाही; महावितरणला पत्रव्यवहार करूनही तोडगा नाही

Well in the field, electricity connection, but no voltage; Correspondence to Mahavitran has no solution

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
शेत ओलितासाठी पदरमोड करून शेतकऱ्याने शेतात विहीर खोदली. डिमांड भरून वीज पुरवठाही घेतला. मात्र, पंपाने ओलित करावे एवढे व्होल्टेज शेतात मिळत नसल्याने गत पाच वर्षांपासून सोयी सुविधा असताना ओलित करणे शक्य होत नाही, यासंदर्भात वारंवार महावितरणला पत्रव्यवहार केला, निवेदने दिली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलून दाखविले. हा प्रकार तालुक्यातील आंबोडा गावातील शेतशिवारात घडत आहे. 


शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखून त्यांना समृद्ध करण्याच्या आव आणणाऱ्या शासनाचे पितळ उघड झाले आहे. तालुक्यातील आंबोडा (लुंगे) येथील शेतकरी वासुदेव राऊत (६९) यांचे आंबोडा शेतशिवारात दोन एकर शेत आहे. शेतात ओलिताची सोय नसल्याने त्यांनी पदरमोड करून शेतात विहीर खोदली. 


महावितरणकडे डिमांड भरून वीज जोडणी घेतली. हजारो रुपये खर्च करून मोटरपंप आणि आवश्यक साहित्यही खरेदी केले. मात्र, देण्यात आलेल्या वीजजोडणीला व्होल्टेजच राहात नसल्याने पाण्याची सोय असताना ओलित करता आले नाही. याची तक्रार महावितरणकडे करण्यात आली होती, त्यांनी अवैधपणे वीजपुरवठा घेणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करीत व्होल्टेजची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही समस्या कायम असल्याने तक्रारी करण्यात आल्या. 


दरम्यान, नवे रोहित्र बसविण्यात आले होते. त्यावर ३२ मोटारपंपांच्या वीज जोडणी असल्याने समस्या जशीच्या तशीच आहे. यासंदर्भात त्यानंतर वारंवार तक्रारी करूनही महावितरण याकडे डोळेझाक करीत असल्याने पिकांचे ओलित करणे अशक्य झाले आहे. 


याकडे संबंधित विभागाने लक्ष देत व्होल्टेजची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी शेतकरी वासुदेव राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 


दोन एकरात सव्वा तीन क्विंटल सोयाबीन
यंदा शेतकरी राउत यांनी सोयाबीनची लागवड केली होती. दोन एकरात त्यांना केवळ ३ विचेटल ३० किलो उत्पन्न झाले. रब्बी हंगामात नुकसान भरून काढू, या आशेवर त्यांनी ३० किलो चणा, ४० किलो गव्हाची पंधरवड्यापूर्वी पेरणी केली. मात्र, व्होल्टेज नसल्याने ओलित करणे शक्य झाले नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. 


अन्यथा टोकाची भूमिका 
"शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. खरिपात उत्पन्न आले नाही. रब्बी हंगामात केलेली पेरणी ओलिताअभावी निघाली नाही. तक्रारी करून थकलो, मात्र, अजून समस्या निकाली निघाली नसल्याने टोकाची भूमिका घेण्यावाचून पर्याय राहिला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देत व्होल्टेजची समस्या सोडवावी, अशी विनंती आहे."
- वासुदेव राऊत, शेतकरी, आंबोडा

Web Title: Well in the field, electricity connection, but no voltage; Correspondence to Mahavitran has no solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.