देवदर्शनाला गेले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 10:16 PM2022-04-08T22:16:38+5:302022-04-08T22:17:17+5:30

हे दरोडेखोर हात साफ केल्यानंतर आपल्या परिवाराला घेऊन देवदर्शनाकरिता पुढचा प्रवास करायचे, त्यामुळे कुणालाही त्यांच्यावर संशय येत नव्हता. या आरोपींकडे एक्सयूव्ही व बोलेरो ही दोन वाहने असून, यामधूनच त्यांचा प्रवास असायचा. ही दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली असून, समुद्रपूर पोलीस ठाण्यात लावली आहेत. यातील एक्सयूव्ही या वाहनावर ‘व्हीआयपी’ असे लिहिले आहे. त्यामुळे कुणालाही या वाहनातून दरोडेखोर प्रवास करीत असल्याचे लक्षात येणार नाही.

Went to Devdarshan and got caught by the police | देवदर्शनाला गेले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

देवदर्शनाला गेले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/समुद्रपूर : महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या अंधारात लुटायचे आणि हात मारला की आपल्या परिवारासोबत देवदर्शनाला जायचे, अशी गुन्ह्याचीपद्धत असलेल्या दरोडेखोरांनी जिल्ह्यात सलग दोन दिवस दोन ठिकाणी मोठा हात मारला. त्यानंतर नवरात्र असल्याने माहूर गडावर दर्शनासाठी निघून गेले परंतु स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांच्या ‘मास्टर माईंड’ समोर दरोडेखोरांची युक्ती फसली. पोलिसांनी जीव धोक्यात टाकून अवघ्या पंधरा तासांत ९ जणांच्या टोळीला माहूर गडावरून अटक केली.
बबलू अप्पा शिंदे (२८), अमोल आप्पा शिंदे (३२), महादेव अंन्सार काळे (२४), उत्तम सुंदर शिंदे (५०)  सर्व रा.खामकरवाडी, दत्ता सुंदर शिंदे (३५) व विकास संजय शिंदे (२१ दोघेही रा. तेरखेडा) आणि सुनील लहू काळे    (२२ ), सर्जेराव तात्याजी शिंदे (२५), लहू राजेंद्र काळे (४५ तिघेही रा. कोठावळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. ६ एप्रिलला नागपूर-अमरावती महामार्गावर पहाटेच्या सुमारास भंडारा येथील उरकुडे परिवाराला मारहाण करून त्यांच्याकडून १ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा ऐवज लुटला लगेच दुसऱ्या दिवशी नागपूर-वणी मार्गावरील समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वणी येथील खान परिवाराला मारहाण करून त्यांच्याकडून ६४ हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. 
याप्रकरणी तळेगाव (श्याम.पंत) व समुद्रपूर पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने तपासला गती दिली. तपास सुरू असतानाच धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथेही महामार्गावर वाहन पंक्चर करून चालकाला लुटल्याचा गुन्हा घडल्याचे माहिती मिळाली. त्यावरुन तपास चक्र फिरवून महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ९ आरोपींना माहूरगडावरुन अटक करुन त्यांच्याकडून एम. एच. २५ आर. ३९२७ व एम. एच.१३ ए. सी. ८०८२ क्रमांकाची वाहने जप्त केली. 
यासह वाहनातील सोने-चांदीचे दागिने, मोबाईल, रोख असा एकूण २४ लाख ६९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींनी वर्धा आणि धुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांची कबुली दिली असून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील तपासाकरीता सर्व आरोपींना समुद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.

दरोडेखोरांचा व्हीआयपी वाहनातून प्रवास

हे दरोडेखोर हात साफ केल्यानंतर आपल्या परिवाराला घेऊन देवदर्शनाकरिता पुढचा प्रवास करायचे, त्यामुळे कुणालाही त्यांच्यावर संशय येत नव्हता. या आरोपींकडे एक्सयूव्ही व बोलेरो ही दोन वाहने असून, यामधूनच त्यांचा प्रवास असायचा. ही दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली असून, समुद्रपूर पोलीस ठाण्यात लावली आहेत. यातील एक्सयूव्ही या वाहनावर ‘व्हीआयपी’ असे लिहिले आहे. त्यामुळे कुणालाही या वाहनातून दरोडेखोर प्रवास करीत असल्याचे लक्षात येणार नाही.

पोलिसांकडून बारा तास चोरट्यांचा पाठलाग
-   समुद्रपूर पोलिसांच्या हद्दीतील महामार्गावर दि. ७ मार्चला पहाटे २.४५ वाजता वाहनचालकाला लुटल्याची माहिती मिळताच सकाळी सहा वाजता स्थानिक गुन्हे शाखेची चमू घटनास्थळी दाखल झाली. चौकशी सुरू असतानाच जाम चौरस्त्यावर दोन संशयित वाहने असल्याची माहिती मिळाली. त्या दिशेने तपासचक्र फिरविले असता वणा नदीच्या खालच्या पुलावरून ती दोन्ही वाहने वर्धेच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक वायगाव (निपाणी) टी- पॉईंटवर पोहोचले. तेथे चाैकशी केल्यानंतर त्या वर्णनाची वाहने वर्धेकडे गेल्याची माहिती मिळाली. 
-    वर्ध्यात आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देवळीकडे गेल्याची माहिती मिळाली. दुपारी १२ वाजता ती दोन्ही वाहने भिडीच्या टोलनाक्यावरून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर या दोन्ही वाहनांचा सलग बारा तास पाठलाग करून माहूरगड गाठले. तर ती वाहने तेथील पार्किंगमध्ये दिसून आली. त्यांनतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले. या वाहनांचा पाठलाग करण्यात पोलीस उपनिरीक्षक लगड व त्यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली.

यांनी बजावली मोलाची कामगिरी
पोलीस अधीक्षक प्रशात होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, परिविक्षाधीन पोलीस अधिकारी शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, समुद्रपूरचे ठाणेदार प्रशांत काळे व तळेगावचे ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, उपनिरीक्षक अमोल लगड, राम खोत, प्रमोद जांभुळकर, संतोष दरगुडे, निरंजन वरभे, गजानन लामसे, नरेंद्र डहाके, हमीद शेख, चंदू बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, रणजित काकडे, प्रमोद पिसे, यशवंत गोल्हर, राजेश जैयसिंगपुरे, गोपाल बावणकर, रितेश शर्मा, मनिष कांबळे, अभिजीत वाघमारे, अमोल ढोबाळे, नीतेश मेश्राम, अविनाश बन्सोड, संजय बोगा, अनिल कांबळे, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेष आष्टणकर, नीलेश कट्टोजवार, अक्षय राउत, अंकित जिभे, अरविंद येनुरकर, वैभव चरडे, रवी पुरोहित, अमोल चौधरी, शाहीन सैयद व स्मिता महाजन यांनी ही कारवाई यशस्वी केली.

धनोडा फाट्यावर आखली व्यूहरचना

-   वर्ध्यातून तपासकामी गेलेल्या पोलिसांच्या सर्व पथकांनी माहितीच्या आधारावर नागपूर-तुळजापूर महामार्गावर लक्ष्य केंद्रित केले. यवतमाळात मिळालेल्या माहितीनुसार सर्व पोलिसांचे पथक यवतमाळ जिल्ह्यातील धनोडा फाट्यावर एकत्र आले. त्या ठिकाणी पुढची व्यूहरचना आखण्यात आली. त्यानंतर वेशांतर करून सर्व पथके आपापल्या दिशेने रवाना होऊन माहूरगडावर पोहोचली. त्या ठिकाणी चोरट्यांच्या वाहनांचे दर्शन होताच पोलिसांच्या आशा पल्लवित झाल्या आणि या कारवाईत यशही मिळाले.

कुणी विकला हार तर कुणी विकली फुले
-    उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वात जवळपास पंधरा पथके आरोपीच्या मागावर माहूरगडावर जाऊन पोहोचले. आरोपींची दोन्ही वाहने तेथील पार्किंगमध्ये असल्याने पोलिसांनी आपली वाहने उभी करून आरोपींची दोन ते तीन तास प्रतीक्षा केली. यादरम्यान वेशांतर करून असलेल्या पोलिसांपैकी काहींनी तेथे हार, फुले विकली तर काहींनी देवदर्शन घेतले. आरोपी देवदर्शनावरून वाहनाकडे येताच त्यांच्यावर झडप टाकून त्यांना जेरबंद केले.

चोरांच्या उलट्या बोंबा...
पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाइलने माहूरगडावर सापळा रचला होता. काही पोलीस वर्दीवर होते तर काहींनी वेशांतर केले होते. आरोपींच्या वाहनांच्या आजूबाजूला वेशांतर केलेले पोलीस तैनात होते. आरोपी परिवारासह दर्शन घेऊन वाहनाकडे येताच पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीतांनीच ‘चोर....चोर....’ अशी बोंब ठोकल्याने स्थानिक दुकानदारही आरोपींच्या मदतीला धावून आले; पण, लागलीच वर्दीतील पोलिसांनी धाव घेतल्याने दुकानदार मागे हटले. आरोपींसह त्यांच्या परिवारातील सदस्यांनी पोलिसांवर चांगलाच हल्ला केला. यात महिलांचाही समावेश होता. या झटापटीत उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप व कर्मचारी राकेश आष्टणकर यांना दुखापत झाली.

 

Web Title: Went to Devdarshan and got caught by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.