व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय?
By admin | Published: May 31, 2017 12:53 AM2017-05-31T00:53:05+5:302017-05-31T00:53:05+5:30
३१ मे २०१६ च्या काळ्याकुट्ट रात्रीची आठवण झाली की नकळत आसवांना वाट मोकळी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव/नाचणगाव : ३१ मे २०१६ च्या काळ्याकुट्ट रात्रीची आठवण झाली की नकळत आसवांना वाट मोकळी होते. बॉम्ब स्फोटानंतर साऱ्यांनीच कोरडा भाव दाखवून सांत्वन केले. आज ३१ मे रोजी घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या एक वर्षात कुठल्याही नेत्यांनी वा अधिकाऱ्यांनी चौकशीही केली नाही. घटनेनंतर काही दिवसांनी पाच लाखांचा धनादेश वाटपाच्या वर्धा येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्यक्ष बोलताना ‘शासन शहिदांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत करू’ असे आश्वासन दिले होते; पण एक वर्ष असताना ते पूर्ण झाले नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय, असा प्रश्न प्रत्यक्ष भेटीत वीरपत्नी प्राची अमित दांडेकर यांनी केला.
विशेष म्हणजे, शहीद अमितचे वडील महादेवराव दांडेकर हे भद्रावती येथील आॅर्डनन्स फॅक्टरीमध्ये कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. मोठा भाऊ सचिन देखील आसाम येथे संरक्षण सेवेतच आहे. दुसरा भाऊ केंद्रीय दारूगोळा भांडारात सेवेत आहे. एकंदरीत शहीद अमित दांडेकर यांचा संपूर्ण परिवार देशाच्या संरक्षण सेवेत असून पत्नी प्राची पदवीधर आहे. अर्पित ७ वर्षे व अर्पिता २ वर्षे अशी अपत्ये असून पतीला देशवासियांचे जीव वाचविताना वीरमरण आल्याचा त्यांना स्वाभिमान आहे; पण अख्खे कुटुंब देशसेवेत असलेल्या कुटुंबाची एक वर्षात कुणी दखल घेऊ नये, याचे दु:ख असल्याचे प्राची सांगते.
शासनाने अग्निस्फोटात शहीद झालेल्यांच्या परिवारास केवळ पाच लाख देऊन तोंडाला पाने पुसली. अद्याप सेवानिवृत्ती वेतन नाही की, वीरपत्नीला नोकरी नाही. अर्पित व अर्पिता त्यांचे बाबा घरी येण्याची वाट पाहत असतात; पण त्यांच्या आठवणीत दोन कच्च्या-बच्च्यांसोबत दिवस काढणारी प्राची शासनाच्या कार्यप्रणालीवर नाराज दिसली.
एकाच घटनेत वीरगती प्राप्त झालेले सैनिक शहीद व इतरांना शहिदांचा दर्जा का नाही - वीरपत्नी जया मेश्राम
गाडगेनगर येथील प्रमोद मेश्राम हे अग्निशामक दलाच्या सेवेपूर्वी २१ वर्षे सीआरपीएफच्या सेवेत होते. यामुळे ते बाहेरच राहायचे. १ मे २००५ मध्ये जयाशी विवाहबद्ध झाले. यानंतर २०१३ पासून अग्निशामक दलात फायरमन पदावर कार्यरत होते. या सेवेत असताना ३१ मे २०१६ च्या अग्निस्फोटात त्यांना वीरगती प्राप्त झाली. या दुर्घटनेत मृतदेह शोधायलाही फार त्रास झाला. या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना आमदार, खासदार, अधिकारी सर्वांनी सहानुभूती दाखविली; पण एक वर्ष लोटूनही शासकीय यंत्रणा या विरांना शहीद जाहीर करू शकली नाही. एकाच घटनेत वीरगती प्राप्त झालेले सैनिक शहीद व त्याच घटनेतील विरांना शहिदांचा दर्जा का नाही, असा संतप्त सवाल वीरपत्नी जया प्रमोद मेश्राम यांनी केला.
२१ वर्षे केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेले शहीद प्रमोद मेश्राम २०१३ रोजी केंद्रीय दारूगोळा भांडारातील अग्निशामक दलाच्या सेवेत रूजू झाले. त्यांच्या मागील २१ वर्षांच्या सेवेचे निवृत्तीवेतन सुरू आहे. त्या तुटपुंज्या वेतनात महागाईच्या काळात घर चालविणे कठीण आहे. शासनाने बॉम्बस्फोटानंतर केवळ पाच लाख देत तोंडाला पाने पुसली; पण अद्याप साधे निवृत्तीवेतनही सुरू केले नाही. २०१३ नंतरच्या न्यू पेन्शन स्कीममध्ये स्व. प्रमोदचे जवळपास दीड लाख जमा आहे. ते वेतनातून कपातीत आहे. ते मिळावे म्हणून केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या अधिकाऱ्यांना वारंवार भेटून मागणी केली; पण अधिकारी वेळ मारून नेत असल्याचे पार्थ (१०) व यर्था (७) या दोन चिमुकल्यांसह असलेली वीरपत्नी जया म्हणाली.
शासनाला घोषणांचा विसर - वीरपत्नी शोभा चोपडे
३१ मे १६ रोजी झालेल्या स्फोटात लिलाधर बापुराव चोपडे अग्निशामक दलातील हे शहीद झाले. आधार गेल्याने कुटुंबाची हानी झाली. पत्नी शोभा पित्याअभावी तीन मुलींसह संसाराचा गाडा रेटत आहे. एक मुलगी अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षाला, दुसरी बीकॉम द्वितीय वर्षाला तर तिसरी दहावीला आहे. अग्निस्फोटानंतर शासनाने विविध घोषणा केले. मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाच्या पुनर्वसनाची आश्वासने दिली; पण आता शासनाला त्याचा विसर पडला, असे वीरपत्नी शोभा म्हणाल्या. पाच लाखांची मदत त्वरित मिळाली; पण निवृत्तीवेतन सुरू झाले नाही, ही खंतही त्यांनी व्यक्त केली.
शहीद बाळू पाखरे, लिलाधर चोपडे, अमित दांडेकर, प्रमोद मेश्राम व अमोल येसनकर या पाचही शहिदांची व्यथा सारखी आहे. शासनाने आश्वासनाप्रमाणे वीरगती प्राप्त पाचही कर्मचाऱ्यांना शहीद घोषित करून योजनांचा लाभ द्यावा. शहीद बाळू पाखरे यांच्या मुलाला, लिलाधर चोपडे यांच्या एका मुलीला, शहीद अमित दांडेकर यांची पदवीधर पत्नी प्राची, शहीद प्रमोद मेश्राम यांची पत्नी जया आदींना शासकीय सेवेत घेत निवृत्ती वेतन सुरू करावे.