जिल्हा संघाच्या दूध संकलनाला शासनाचे निकष का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 11:57 PM2019-02-05T23:57:43+5:302019-02-05T23:58:17+5:30
जिल्ह्यात अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन करीत आहे. यासाठी कोणतेही निकष लावण्यात आले नाही. मात्र जिल्हा दूध संघामार्फत संकलित होणाºया दूधासाठी मोठ्या प्रमाणावर निकष लावण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन करीत आहे. यासाठी कोणतेही निकष लावण्यात आले नाही. मात्र जिल्हा दूध संघामार्फत संकलित होणाºया दूधासाठी मोठ्या प्रमाणावर निकष लावण्यात आले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे नुकसान होत आहे. शासनाच्या अन्न पुरवठा विभागाने खासगी दूध संकलन करणाºयांचेही दूध तपासावे, अशी मागणी वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष सुनिल राऊत यांनी केली आहे.
वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघाला दूध संकलनासाठी ११ हजार लिटर दूधाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. पूर्वी ८ हजार लिटर मर्यादा होती. ती २ हजार लिटरने वाढवून देण्यात आली. जिल्ह्याच्या १२ मार्गावरून दूधसंघ हे दूध संकलीत करीत असते. अनेकवेळा दूध उत्पादक अतिरिक्त दूधही जिल्हा दूध संघाला देतात. या दूधाचे संकलन करताना वेगवेगळे निकष ठेवण्यात आले आहे. त्याचे परिक्षण केल्यावरच दूधाची गुणवत्ता ठरविली जाते. मात्र हे निकष खासगी दूध संकलीत करणाºया कोणत्याही कंपनीला लागू करण्यात आलेली नाही. ते कमी, जास्त प्रतिचे सर्वच दूध संकलीत करतात. अनेकदा शेतकºयांना ज्यादा भावाचे आमीष दाखविले जाते. आमच्या दूध संघाने खरेदी केलेले दूध गुणवत्तेत नाही म्हणून परत पाठविल्याच्याही घटना घडल्या आहे. वर्धा जिल्ह्यात दूधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्याने राज्यशासनाने सर्वच दूध खरेदी करण्याची मुभा जिल्हा दूध संघाला द्यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे. याबाबत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शासनाकडे बैठक लावून हा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले, अशी माहितीही राऊत यांनी दिली आहे.