साहित्यिकांचीच वणवण; संमेलनाचे फलित काय? भारूकाकांनी उपस्थित केला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 12:02 PM2023-02-03T12:02:28+5:302023-02-03T12:03:32+5:30
आत्मक्लेषाचीही दखल कोणी घेईना
वर्धा : बदलत्या अभ्यासपद्धती आणि इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांवरील ताणतणाव वाढत गेले. यातूनच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले. हे सर्व भयावह चित्र पाहून ‘भारूकाका’ने शासकीय नोकरी सोडून विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून रोखण्याकरिता आणि त्यांना नवी प्रेरणा देण्याकरिता ‘भारूकाकाची पत्रे’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा, म्हणून लेखक गेल्या काही वर्षांपासून वणवण भटकत आहे; परंतु त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे ‘येथे लेखक-साहित्यिकांचीच वणवण होत असेल तर कोट्यवधीचे साहित्य संमेलन घेण्याचे फलित तरी काय,’ असा संतप्त सवाल ‘भारूकाका’ म्हणजेच महेंद्र गौरीकुमार बैसाणे यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. कोट्यवधीचा खर्चही केला जातो. परंतु, अद्यापही साहित्यिक आणि लेखकांबद्दल जाणिवा बोथटच असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. यादृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता यावी व त्यांनी तणावमुक्त होऊन येणाऱ्या परीक्षांना सामोरे जावे, यासाठी ‘भारूकाकाची पत्रे’ हे पुस्तक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्याकरिता ‘भारूकाका’ प्रयत्नरत आहेत. त्यांनी शालेय शिक्षणमंत्री व मराठी भाषा मंत्री, विश्व मराठी संमेलनादरम्यानही निवेदन सादर केले; मात्र अद्यापही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा उज्ज्वलादेवी पाटील यांची प्रस्तावना आहे. तसेच हे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण प्रशिक्षण क्रमच आहे. या पुस्तकाचा शासनाने नाही, तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी तरी विचार करावा, म्हणून आजी-माजी अध्यक्षांनाही साकडे घातले; पण त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत लेखक महेंद्र गौरीकुमार बैसाणे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
कोणी पुस्तक घेता का पुस्तक?
९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखक महेंद्र बैसाणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी गाठली आहे. त्यांनी आयोजकांची भेट घेत आपले निवेदन दिले; परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाध्यक्षांसह महामंडळाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष व समन्वयकांच्या नावे निवेदन तयार करून ‘कोणी पुस्तक घेता का पुस्तक?’ अशी विनंती त्यांनी केली आहे.