ऑनलाईन चालान काय कामाचे ?, 90 लाखांपैकी 38 लाख अजूनही ‘अनपेड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:00 AM2020-12-25T05:00:00+5:302020-12-25T05:00:17+5:30
वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या तुलनेत रस्ते म्हणावे तितके चांगले आणि सुरक्षित राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलीस वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी प्रयत्नशील असतात. हेल्मेट वापरणे, स्पीड लिमिट पाळणे, रॉंगसाईड वाहन न चालविणे, अशा प्रकारच्या सूचना वारंवार आणि सातत्याने दिल्या जातात. तरीही काही वाहनचालक वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशा वाहनांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ई-चालान दिले जाते. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत वाहतूक पोलिसांनी १२ हजार ४१४ नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. त्यांना ९० लाख ३ हजार ५५० रुपयांच्या दंडाचे ऑनलाईन चालान पाठविले. परंतु, त्यापैकी तब्बल ३८ लाख ५९ हजार ७०० रुपये दंड अजूनही अनपेड असून ५१ लाख ४३ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आहे.
वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या तुलनेत रस्ते म्हणावे तितके चांगले आणि सुरक्षित राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलीस वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी प्रयत्नशील असतात. हेल्मेट वापरणे, स्पीड लिमिट पाळणे, रॉंगसाईड वाहन न चालविणे, अशा प्रकारच्या सूचना वारंवार आणि सातत्याने दिल्या जातात. तरीही काही वाहनचालक वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशा वाहनांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. अनेकांकडे पोलिसांना देण्यासाठी दंडाची रक्कमही नसते. तेव्हा पोलीस चालान मशीनमध्ये फोटो काढून दंडाची रक्क्म पेड आहे की अनपेड याची नोंद करतात. शहर वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत १२ हजारावर वाहनचालकांवर कारवाई करुन ९० लाख तीन हजार ५५० रुपयांचे ऑनलाईन चालान दिले. सध्या शहरात सीटबेल्ट न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच राँगसाईड वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई सत्र सुरु आहे. वाहतूक पोलीस शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सज्ज आहे.
२१ हजार चालकांनी भरला ऑनलाईन दंड
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना ईचालान देण्यात आली. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत २१ हजार ८८९ नागरिकांनी ५१ लाख ४३ हजार ८५० रुपयांचा दंड वाहतूक विभागाकडे ईचालानद्वारे जमा केल्याची माहिती आहे.
शहरातील बजाज चाैक, आर्वीनाका परिसर, बॅचलर रोड परिसर आदी अनेक चाैकांमध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसतात. त्यातही काही बेफाम वाहनचालक पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसतात. त्यामुळे अशांवरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही होते आहे.