दोन शाळेत नाव असलेल्या अडीच हजार विद्यार्थ्यांचे अन् शिक्षकांचे काय होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 10:37 PM2021-12-31T22:37:26+5:302021-12-31T22:38:28+5:30
जिल्ह्यातील एकूण २,१०,०९३ विद्यार्थ्यांपैकी १,९९,९७९ विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आधार नोंदणी केली आहे. त्यापैकी २,५७५ विद्यार्थ्यांचे आधार दोन ठिकाणी अपलोड केल्याचे दर्शविले जात आहेत, तर ४८,८२५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिसमॅच दाखवित आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्याही अडचणी वाढल्या असून, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून तातडीने नव्याने अपलोड करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाकडून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची संचमान्यता दिली जाते. याकरिता शाळेमध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असून, त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बंधनकारक केले आहे. विशेषत: संचमान्यतेकरिता आता आधार अपडेट असलेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या गृहीत धरली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण २,१०,०९३ विद्यार्थ्यांपैकी १,९९,९७९ विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आधार नोंदणी केली आहे. त्यापैकी २,५७५ विद्यार्थ्यांचे आधार दोन ठिकाणी अपलोड केल्याचे दर्शविले जात आहेत, तर ४८,८२५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिसमॅच दाखवित आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्याही अडचणी वाढल्या असून, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून तातडीने नव्याने अपलोड करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिक्षकांच्या संच मान्यतेकरिता पोर्टलवर आधार नोंदणी असलेली विद्यार्थी संख्याच ग्राह्य धरली जाणार आहे. परंतु शाळेमध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी प्रवेशित असताना आधार मिसमॅट्च होत असल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहे. यासंदर्भात सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना करुन डुप्लिकेट अन् मिसमॅट्च विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करुन नव्याने अपलोड करण्यास सांगितले आहे.
लिंबाजी सोनवणे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक़
शिक्षक संघटनांचे पदाधिकारी म्हणतात...
संचमान्यता अंतिम करण्यासाठी आधार लिंक आवश्यक आहे. याबाबत कोणतीही शंका नाही. खोटी पटसंख्या नोंदणीला निर्बंध करणेही गरजेचे आहे. मात्र, आधारवरील नोंदी अपडेट करण्यात अनंत अडचणी येत आहे. यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांना जबाबदार धरून माहिती मिसमॅट्च असल्यास पटनोंदणी खोटी ठरवून शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे म्हणजे दुखणे दुर्लक्षित करून जालीम उपाय वारणे होईल.
- विजय कोंबे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
संचमान्यता निर्धारित करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत असलेली पटसंख्या ग्राह्य धरली जाते. त्यामुळे शासनाने यापूर्वीच आधार नोंदणी करण्याकरिता विशेष शिबिर आयोजित करुन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. आता तारीख उलटून गेल्यानंतर विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी खटाटोप केला जात आहे. शासनाची ही कृती शिक्षकांकरिता अन्यायकारक आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंतच्या पटसंख्येनुसारच संचमान्यता द्यावी.
- अजय भोयर, कार्यालय मंत्री, शिक्षक परिषद.