"मराठा आरक्षणासाठी जे काही करावं लागेल, ते सर्वकाही सरकार करेल"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 18:37 IST2023-02-03T18:11:32+5:302023-02-03T18:37:22+5:30
वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे.

"मराठा आरक्षणासाठी जे काही करावं लागेल, ते सर्वकाही सरकार करेल"
वर्धा - मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलिंबित आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजातील तरुण आजही सरकारकडे विनंती, पत्र आणि आंदोलनातून भूमिका मांडत आहेत. ५ फेब्रुवारीपासून अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथे गोदाकाठचे शेकडो गावे एकत्र येत आरक्षणसाठी आंदोलन करणार आहेत. गेल्याच आठवड्यात गावकऱ्यांना या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी एक तास मंत्रालयात चर्चाही केली. आता, वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारने लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी त्याचप्रमाणे मराठा आरक्षण कधीपर्यंत मिळेल याचा टाईम बॉण्ड द्यावा अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मोठ्या आंदोलनाच्या तयारी करून राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे बाबासाहेब पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी दिला होता. त्यानंतर, आता पुन्हा एकदा मराठा समाजातील तरुण आक्रमक झाले आहेत. त्यास, मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले असून योजना सुरू आहेत. अधिसंख्य पदांचा निर्णयही आपल्याच सरकारने घेतला. सर्वोच्च न्यायालयात तज्ज्ञ वकिलांची फौज उभा करण्यात येत आहे. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सर्व सरकार करेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
वर्धा येथे पत्रकारांशी संवाद.. https://t.co/m617jKNbJ6
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 3, 2023
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. सेवाग्रामचा परिसर हा महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे, असेही शिंदेंनी यावेळी म्हटले.