गहू, चणा नुकसानीच्या अनुदान यादीत घोळ
By Admin | Published: September 4, 2015 02:11 AM2015-09-04T02:11:35+5:302015-09-04T02:11:35+5:30
गतवर्षीच्या रबी हंगामात दर १५ दिवसांनी वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्याने शेतातील गहू व चना पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
नुकसानग्रस्त शेतकरी वंचित : रबी हंगामात पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांना मिळतोय लाभ
रोहणा : गतवर्षीच्या रबी हंगामात दर १५ दिवसांनी वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्याने शेतातील गहू व चना पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान वाटप सुरू केले. त्या यादीत तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी प्रचंड घोळ केला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरीही अनुदानापासून वंचित राहीले. पेरणीच नव्हती, अशा शेतकऱ्यांना मात्र अनुदानाचा लाभ मिळत आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, तेव्हा त्यांना मदत म्हणून शासन अनुदानाच्या रूपात आर्थिक मदतीचे वितरण करते. नुकसानग्रस्त पिके व त्यांचा आराजीचा सर्व्हे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक संयुक्तरित्या करतात. यानंतर तयार यादीवर त्या कर्मचाऱ्यांनी सह्या करून अहवाल तहसील कार्यालयात सादर करायचा असतो; पण प्रत्येक सर्व्हेच्या वेळी प्रचंड घोळ केला जातो. नुकसानग्रस्तांना अनुदानापासून वंचित ठेवून नुकसान न झालेल्यांची नावे यादीत टाकली जातात. याबाबत प्रत्येकवेळी शेतकऱ्यांची ओरड होते. अनेकदा तक्रारी झाल्या, काही कर्मचाऱ्यांवर कारवाईही झाली; पण हात ओले करून घेण्याच्या सवयीत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांमुळे यादीतील घोळ नेहमीचाच झाला आहे.
२०१४-१५ च्या रबी हंगामात रोहणा परिसरात प्रत्येक १५ दिवसांनी शेतकऱ्यांना वादळी वारा, पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला. यात गहू व चणा पिकांचे मोठे नुकसान झाले. हाता- तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. संत्रा उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले. त्या नुकसान भरपाईचे वाटप नुकतेच सुरू झाले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी उपरोक्त तिन्ही कर्मचाऱ्यांना आपल्या नुकसानीबाबत पुर्वसूचना दिली होती. कर्मचाऱ्यांनी देखील तुमचे नाव यादीत समाविष्ट केल्याचे सांगितले होते. प्रत्यक्ष वाटप झाल्यावर लक्षात आले की, यादीत अनेकांची नावे नसल्याने त्यांना अनुदानाचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष देत यादीत घोळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.