विद्युत तारेत घर्षणाने गव्हाचा झाला कोळसा; शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास हिरावला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 01:04 PM2023-02-16T13:04:54+5:302023-02-16T13:08:29+5:30
दीड एकरातील संपूर्ण गहू जळून खाक
वर्धा : शेतातून गेलेल्या जीवंत विद्युत तारेत घर्षण होत आगीची ठिणगी उभ्या गहू पिकात पडली. अशातच आगीने संपूर्ण गहू पिकाला आपल्या कवेत घेत होत्याचे नव्हते केल्याने सालोड (हिरापूर) येथील शेतकरी किशोर झोड यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.
सालोड (हिरापूर) येथील शेतकरी किशोर भगवान झोड यांचे शामपूर शिवारात शेत आहे. खरिपात त्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेली. खरिपातील नुकसानीची भरपाई निघावी, या हेतूने मोठे धाडस करून त्यांनी रब्बीत दोन एकर शेतजमिनीवर गव्हाची लागवड केली. पिकाची योग्य निगा घेतल्याने कापणी अंती चांगले उत्पन्न होईल, अशी आशा झोड यांना होती; पण बुधवारी अचानक लागलेल्या आगीत दीड एकरातील संपूर्ण गहू पीक कोळसा झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी झोड यांच्या शेताकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले; पण तोवर दीड एकरातील गहू पीक आगीच्या भक्षस्थानी पडून कोळसा झाले. पीक जळून मोठे नुकसान झाल्याने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.