.... जेव्हा १०० वर्षे जुन्या झाडातून निघू लागतात आगीचे लोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 08:44 PM2022-04-11T20:44:17+5:302022-04-11T20:45:22+5:30
Wardha News वर्धा जिल्ह्यातील रोठा परिसरात असलेल्या एका झाडाला अचानक आग लागली. किमान १०० वर्षे जुने असलेले हे झाड अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून वाचवले.
वर्धा : सध्या उन्हाचा पारा ४२ अंशांवर गेला असताना शहरासह जिल्ह्यात आग लागल्याच्या घटनांमध्येही मागील आठ दिवसांत कमालीची वाढ झाली आहे. अशातच रोठा परिसरात असलेल्या एका शेतातील सुमारे १०० वर्षांपेक्षा जास्त जुन्या वडाच्या झाडातून आगीचे लोळ उठताना दिसून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करून पाण्याचा मारा केल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
अजिज कमालुद्दीन तुरक (६१) रा. दयालनगर यांचे सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या रोठा शिवारात शेत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास परिसरातील शेतकरी व शेतमजूर शेतात कामे करीत असतानाच तुरक यांच्या शेतात असलेले १०० वर्षे जुन्या वडाच्या झाडातून धूर निघत असल्याचे दिसून आले. काही वेळातच अचानक झाडाच्या खोडाच्या मधातून आगीचे लोळ उठू लागले. परिसरातील शेतकरी व शेतमजुरांना नेमके आग लागली कुठे हे कळेनासे झाले होते. मात्र, आगीचे लोळ झाडातून निघत असल्याचे समजताच सावंगी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. शेतात आग पसरू नये, म्हणून तत्काळ पोलिसांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली. सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मल्हारी ताळीकुटे आणि समीर फटींग हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तेवढ्यातच एमएच. ३२ एजे. ३४२७ क्रमांकाचे अग्निशमन बंब दाखल झाले. चालक राजू ढुमणे, फायरमॅन मयूर सोनवणे तसेच शेतकरी अब्दुल अजिज कमालुद्दीन तुरक तसेच शेतातील मजुरांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवून अखेर आग विझविण्यात आली.
‘डायल ११२’चे वाहन तत्काळ दाखल...
अजिज कमालुद्दीन तुरक यांच्या शेतातील वडाच्या जुन्या डौलदार झाडाला आग लागल्याचे दिसून येताच शेतकरी व शेतमजुरांनी तत्काळ पोलिसांच्या नव्या डायल ११२ वर याची माहिती दिली. दरम्यान अवघ्या काही मिनिटांतच सावंगी ठाण्याचे पीएसआय मल्हारी ताळीकुटे हे त्यांच्या टिमसह घटनास्थळी दाखल झाल्याने शेतकऱ्याला दिलासा मिळाला.
.....................