शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांचा 'लंच टाइम' नेमका कधी?
By अभिनय खोपडे | Published: August 9, 2023 10:34 PM2023-08-09T22:34:44+5:302023-08-09T22:35:28+5:30
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून, पीककर्जाकरिता शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची आवश्यकता आहे. या
वर्धा : ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक व वृद्ध मंडळी विविध कामांकरिता तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालय व बँकांमध्ये जातात. परंतु बऱ्याच शासकीय कार्यालयात साहेब नाही, साहेब जेवण करायला गेले. आता कर्मचाऱ्यांचा लंच टाइम झाला, असे उत्तर दिले जाते. त्यामुळे कामांचा खोळंबा होत असून, नागरिकांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा नेमका लंच टाइमचा वेळ कोणता? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून, पीककर्जाकरिता शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची आवश्यकता आहे. यासोबतच वृद्धांचे निराधारांची रक्कम येत नाही किंवा शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही, यासह अनेक तक्रारी घेऊन नागरिक शासकीय कार्यालयात येतात. तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी पैसा आणि वेळ खर्च करावा लागत आहे; पण कार्यालयात आल्यानंतर खुर्च्या रीत्या पाहून परतून जावे लागत आहे.
कधी-कधी लंच टाइमचे कारण पुढे केले जाते. त्यामुळे दोन ते अडीच तास प्रतीक्षा केल्यावरही कर्मचारी खुर्चीवर बसत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील लंच टाइम कोणता आणि किती वेळाचा, यासंदर्भात वरिष्ठांनी लक्ष देऊन या कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची मागणी होत आहे.