कापूस विक्रीसाठी आमचा नंबर केव्हा? शेकडो शेतकरी करताहेत विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 02:09 PM2020-05-16T14:09:31+5:302020-05-16T14:10:29+5:30
सीसीआयला कापूस देण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु, नाममात्र गाड्यांमधील कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे दररोज शेकडो शेतकरी आमचा नंबर केव्हा लागणार अशी विचारणा बाजार समितीकडे करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सीसीआयला कापूस देण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु, नाममात्र गाड्यांमधील कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे दररोज शेकडो शेतकरी आमचा नंबर केव्हा लागणार अशी विचारणा बाजार समितीकडे करीत आहेत. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडून आहे. इतकेच नव्हे तर व्यापारी शेतकऱ्यांच्या कापसाला नाममात्र भाव देत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस देण्याची तयारी दर्शवित नोंदणीही केली आहे. लॉकडाऊनच्या काळातही शेतकऱ्यांना कापूस विकता यावा यासाठी सीसीआयचे केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे. समुद्रपूर बाजार समितीकडे ६,८६५ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणीही केली आहे. मात्र, मजूर नसल्याने सुदर्शन कॉटन जिनिंग जाम येथे १५ गाड्या, श्रीकृष्ण जिनिंग धोंडगाव येथे २० गाड्यांमधीलच कापसाची खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे मागील १४ दिवसांत केवळ २४० गाड्यांमधीलच कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरीही आमचा नंबर केव्हा लागेल अशी विचारणा करण्यासाठी बाजार समितीत गर्दी करीत आहेत.
तक्रारीची घेतली दखल
कापूस खरेदीत सावळा गोंधळ होत असल्याची तक्रार प्राप्त होताच एस. पी. गुघाने व यु. एस. कापकर यांच्या समितीने समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जावून चौकशी केली. इतकेच नव्हे तर सीसीआयला पाठविलेल्या कापूस गाड्यांची यादी व नोंदणी झालेल्या रजिस्टरची तपासणी केली. परंतु, या चौकशी समितीच्या हाती सावळा गोंधळ झाल्याबाबतचे कुठलेही पुरावे लागलेले नाही. तसा अहवालही वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे.
सचिवांनी केला शेतकऱ्यांचा गैरसमज दूर
शुक्रवारी सुमारे १०० च्या वर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीवर धडक देऊन आमचा नंबर केव्हा लागेल अशी केली. त्यावेळी बाजार समितीचे सचिव शंकर धोटे यांनी पुढे येत शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकºयांचे समाधान न झाल्याने त्यांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळवून परिस्थितीची माहिती नायब तहसीलदार महेंद्र सुर्यवशी यांना दिली. शिवाय प्रत्येक दिवशी किमान २०० गाड्यांमधील कापूस घेण्याच्या सूचना सीसीआयला देण्याची मागणी यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केली.