‘विद्रोही’च्या सभामंडपात मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पोहोचतात तेव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2023 10:31 PM2023-02-04T22:31:17+5:302023-02-04T22:32:05+5:30
Wardha News ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर सडकून टीका करण्यात आली त्या संमेलनाच्या साहित्यनगरीला भेट देत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी साहित्यिक सोहार्द तसेच वैचारिक प्रगल्भतेचा परिचय दिला.
गजानन चोपडे
कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरी (वर्धा) : ज्या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर सडकून टीका करण्यात आली त्या संमेलनाच्या साहित्यनगरीला भेट देत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी साहित्यिक सोहार्द तसेच वैचारिक प्रगल्भतेचा परिचय दिला. वैचारिक दंगलीत एकमेकांपुढे उभे ठाकलेल्या या दोन्ही संमेलनाची आज गांधीभूमीत चांगलीच चर्चा होती.
अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे शनिवारी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी उद्घाटन झाले. या सत्रात मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी मराठी साहित्य संमेलनाला पाण्यात पाहत सडकून टीका केली. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांपेक्षा केवळ जेवणाच्या मेन्यूवरच मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी भर दिल्याचा घणाघाती आरोपही विद्रोही संमेलनाच्या मंचावर करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संमेलनाला हजेरी लावणाऱ्या साहित्यिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अचानक सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद चपळगावकर आणि डॉ. अभय बंग यांनी थेट ‘विद्रोही’चा सभामंडप गाठला.
या दोन्ही ज्येष्ठ साहित्यिकांना बघून आयोजकांना आश्चर्याचा धक्का बसला. दोघांचाही यावेळी सूतमाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. न्या. चपळगावकर आणि डॉ. अभय बंग जवळपास ३० मिनिटे सभामंडपात नुसते थांबलेच नाहीत, तर वैचारिक देवाण-घेवाणही केली. 'विद्रोही'च्या १७ वर्षांतील संमेलनकाळात पहिल्यांदा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला भेट दिली, हे विशेष. मनात कुठलेही हेवेदावे न ठेवता आपल्या वैचारिक स्पर्धकाच्या दारात जाण्याचा जो मोठेपणा न्या. चपळगावकर आणि डॉ. बंग यांनी दाखविला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.