अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्वप्न कधी पूर्ण होणार? उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 05:29 PM2024-08-14T17:29:13+5:302024-08-14T17:30:39+5:30
विद्यार्थ्यांचा सवाल: शैक्षणिक क्षेत्रात आर्वी परिसर मागासलेलाच
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : येथील देऊरवाडा मार्गावर २० एकरांत जिल्ह्यातील एकमेव असलेले शासकीय तंत्रनिकेतन आहे. विद्यार्थ्यांचा ओढा शासकीय तंत्रनिकेतनकडे आहे. तंत्रनिकेतन उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसाठी मात्र परजिल्ह्यांत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांची अडचण होते. त्यामुळे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्वप्न कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.
येथे शासकीय जागा व सुविधा उपलब्ध आहे. अनेक वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाची मागणी आहे. पालक व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन आमदार दादाराव केचे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदने दिले होते. त्यांनी यावर तातडीने निर्णय घेऊन या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही कशाचाच पत्ता नाही.
त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्वप्न स्वप्नच राहील का?, असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तालुक्यात एकमेव शासकीय तंत्रनिकेतन सोडले, तर शैक्षणिक बाबींची मोठी वानवा आहे. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आहे. मात्र, वेगळे असे कोणतेही तांत्रिक, संगणकीय व इतर प्रशासकीय शिक्षण नाही. त्यामुळे पारंपरिक शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आदी ठिकाणी जावे लागते. विभागात एकही मोठा कारखाना, उद्योग, एमआयडीसी नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देऊन पाठपुरावा करणार कोण?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गरीब, गरजू विद्यार्थ्यांना होईल लाभ
येथे अभियांत्रिकी महाविद्यालय होणार, अशी चर्चा असल्याने विद्यार्थ्यांना खूप समाधान वाटले. सध्या तंत्रनिकेतन उत्तीर्ण झाल्यावर बीई करण्यासाठी बाहेर जिल्ह्यात जावे लागते. आई, वडील शेतकरी असून, बाहेर ठिकाणी राहण्याचा व इतर खर्च परवडणार नाही. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झाल्यास अनेक गरीब, गरजू मुली, मुले यांना लाभ हाईल, असे मत तंत्रनिकेतनची विद्यार्थिनी तन्वी केणे हिने व्यक्त केले.