यशवंत विद्यालयाची इमारत कधी होणार?
By admin | Published: March 17, 2017 02:05 AM2017-03-17T02:05:17+5:302017-03-17T02:05:17+5:30
शाळा बांधकामासाठी काही वर्षांपूर्वी देवस्थानच्या मालकीची जागा यशवंत संस्थेने घेतली; पण त्या जागेवर अद्याप शाळेची इमारत उभी झाली नाही.
पालक व ग्रामस्थांचा सवाल : ४० वर्षांपासून ती जागा इमारतीच्या प्रतीक्षेत
घोराड : शाळा बांधकामासाठी काही वर्षांपूर्वी देवस्थानच्या मालकीची जागा यशवंत संस्थेने घेतली; पण त्या जागेवर अद्याप शाळेची इमारत उभी झाली नाही. यामुळे शाळा इमारत बांधकामाचा मुहूर्त सापडणार काय, असा प्रश्न ग्रामस्थ व पालक उपस्थित करीत आहेत.
घोराड येथे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेने शाळा सुरू केली, तेव्हा जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत इयत्ता ५ ते ७ भरविले जात होते. १९८४ मध्ये ही शाळा ५ ते १० वर्गापर्यंत झाली. तेव्हा या संस्थेने पांडुरंग राऊत यांच्या मालकीची असलेली इमारत किरायाने घेतली. ३३ वर्षांपासून यशवंत शाळा भाड्याच्या इमारतीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. ४० वर्षांपूर्वी या संस्थेने हिंगणी मार्गावरील रस्त्यालगत विठ्ठल-रूख्माई देवस्थान ट्रस्टच्या मालकीची तीन एकर जागा शाळेची इमारत बांधकामासाठी शासकीय नियमानुसार खरेदी केली; पण या जागेवर अद्याप शाळा इमारतीचे बांधकाम करण्यात आले नाही. या जागेचा संस्थेकडून क्रीडांगण म्हणूनही कधीच वापर करण्यात आला नाही. या जागेवर काटेरी झुडपे वाढली आहे. ती जागा पडिक का ठेवली, हा संशोधनाचा विषय आहे.
शाळेच्या इमारतीचे बांधकाम करायचे नव्हते तर देवस्थानची जागा खेरदी का केली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या जि.प. निवडणूक प्रचारात हा मुद्दा चर्चेला आला. जाहीर सभेत यशवंत संस्थेने ४० वर्षांपूर्वी घेतलेल्या विठ्ठल-रूख्माई देवस्थानच्या तीन एकर जागेवर इमारत उभी न झाल्याने ती देवस्थान ट्रस्टने परत घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. या मागणीला ग्रामस्थांचे समर्थन राहील, असे आवाहन माजी जि.प. सदस्य सुरेंद्र खोपडे यांनी केले होते. यामुळे ग्रामस्थांचे लक्ष त्या जागेकडे लागले आहे. संस्था शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू करणार की ती जागा देवस्थानाला परत मिळवून देण्यासाठी कुणी पुढाकार घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ४० वर्षांनी जागेचा मुद्दा चर्चेत आल्याने ग्रामस्थ मात्र सजग झाले.(वार्ताहर)