२० हजारांची लाच घेताना कृषी सहायक एसीबीच्या जाळ्यात
By admin | Published: September 29, 2014 11:10 PM2014-09-29T23:10:09+5:302014-09-29T23:10:09+5:30
आष्टी तालुका कृषी सहायक दिवाकर विश्वनाथ शेळके याला २० हजार रुपयांची लाच घेताना वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी १२ वाजताच्या
वर्धा : आष्टी तालुका कृषी सहायक दिवाकर विश्वनाथ शेळके याला २० हजार रुपयांची लाच घेताना वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आर्वी येथे करण्यात आली.
देशमुख इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला आष्टी तालुक्याच्या बोरखडी येथील मौजा क्रमांक १० मध्ये कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन योजनेंतर्गत शेततळ्याचे काम करण्याचा कंत्राट फेब्रुवारी २०१४ ला मंजूर झाला होता. त्यांनी मे २०१४ पर्यंत १३८ घनमीटर खोदकाम जेसीबीने केले. या कामापोटी त्यांना ३ लाख १९ हजारांचा धनादेश १२ आॅगस्टला मिळाला होता. या धनादेशापोटी साडेपाच टक्केप्रमाणे दिवाकर शेळके याने देशमुख यांना ७५ हजार ९०० रुपयांच्या कमिशनची मागणी केली. शिवाय एम.बी.मध्ये १३ हजार ८०० घनमीटरपेक्षा जास्त कामाची नोंद घेतली असून तुम्हाला ९० हजारांचा जास्तीचे बिल मिळणार आहे, तेव्हा तुम्ही मला दोन्ही मिळून १ लाख ४८ हजार रुपयांची मागणी केली. यानंतर देशमुख यांनी ६ सप्टेंबरला शेळके यांना ३५ हजार दिले. त्यानंतर ९ हजार रुपये दिले आणि २९ सप्टेंबरला २० हजार रुपये देण्याचे ठरले. ते घेताना शेळकेला पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१३, १ ड प्रमाणे कारवाई करण्यात आली.(प्रतिनिधी)