पांढरं सोनं घरातच ! शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा; शेतकऱ्यांची झालीय पुरती आर्थिक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:19 IST2025-01-25T17:18:07+5:302025-01-25T17:19:39+5:30

Vardha : त्वचेचा आजार; कमी भावात तरी कसा विकणार ?

White gold at home! Farmers are waiting for price hike; Farmers are in enough financial trouble | पांढरं सोनं घरातच ! शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा; शेतकऱ्यांची झालीय पुरती आर्थिक कोंडी

White gold at home! Farmers are waiting for price hike; Farmers are in enough financial trouble

लोकमत न्यूज नेटवर्क 
चिकणी (जामणी):
अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत कापसाची विक्री केली नव्हती. मात्र, आता भाव वाढीची आशा धूसर होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढला आहे, साठवून ठेवलेल्या कापसामुळे आता अंगाला खाज सुटू लागली आहे, याशिवाय यावरील किड्यांचा त्रासही वाढला आहे, याशिवाय उंदीर, विस्तव, इलेक्ट्रिक आदींचा धोका निर्माण झाला आहे.


केंद्र शासनाने कापसाचे हमी दर जाहीर केले. मात्र, त्यापेक्षाही जास्त खर्च कापसाला आला आहे. सीसीआयकडून मिळणारा दर परवडणारा नसल्याने जिल्ह्यातील निम्म्या अधिक शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला आहे. आतापर्यंत कापसाची जेवढी खरेदी करण्यात आली आहे. अजूनही त्याच्या निम्मा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. काही शेतकऱ्यांचा कल सीसीआयकडे वाढला आहे. मात्र, याचवेळी खुल्या बाजारात कापसाचे दर पडले आहेत. ६८०० ते ७००० रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी केली जात आहे, तर सीसीआय ७५२१ रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहे.


दोन रूमचे घर; एक खोली झालीय कापसाने पॅक 
पूर्वी गावखेड्यात शेतकऱ्यांचे मोठमोठे घरे असायची, पण वाढत्या लोकसंख्येमुळे शेतासह घरांच्याही वाटण्या झाल्या. यामुळे आता घराच्या खोल्याही जेमतेम राहिल्या, दोन रूममधील एक रूम कापसाने पॅक झाली, तर वापर करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


उंदीर अन् विस्तवापेक्षा विद्युतचा अधिक धोका... 
अनेक शेतकरी कापसाची साठवणूक करतात. साठविलेल्या कापसाला विविध प्रकारच्या संकटांचा थोका असतो, इलेक्ट्रिकच्या शॉर्ट सर्किटमुळे कापूस जळण्याच्या दरवर्षी घटना घडतात. यामुळे उंदीर अन् विस्तवापेक्षा विद्युतचा धोका अधिक असतो.


जेवणाच्या ताटापर्यंत कापसावरील किडे 
शेतकऱ्यांचे घर दोन-तीन रूमचे असल्याने व यातील एका रूममध्ये कापूस भरून ठेवावा लागतो. त्यामुळे कीडे जेवणाच्या ताटापर्यंत येतात.


लग्नसराईने चणचण, आता विकावाच लागणार आहे 
हल्ली लग्नसराई सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात कापसाची विक्री करतात. विक्रीनंतर दर वाढले, तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पण, आता चणचण असल्याने कापूस विकल्या शिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्याकडे उपलब्ध नाही.


अंगाला खाज; विविध आजार, लहान मुलं हैराण 
साठवून ठेवलेल्या कापसावर विविध प्रकारच्या किडे तयार होतात, एवढेच नव्हे, तर हवेत तरंगणारे तंतू ही होतात. यामुळे अंगाला खाज सुटून थामे येतात, अंग ठिकठिकाणी लाल होते, याचा लहान मुलांना अधिक त्रास होतो.


संक्रांत उलटली, कापसाने शेतकऱ्यांवर संक्रांत आली 
शेतकऱ्यांवर वर्षभरही संक्रांतच असते. प्रत्येक उत्पादनावर संक्रांत येतेच. आता संक्रात होऊन दहा दिवसहून अधिक लोटले, पण कापसावरील संक्रांत मात्र कायमच आहेत


७००० यापुढे भाव अद्यापही सरकला नाही
केंद्र सरकारने कापसाचे हमीभाव ७५२१ रुपये जाहीर केले. मात्र, शेतकऱ्यांकडून व्यापान्यांनी सात हजारांच्या आतच कापसाची खरेदी केली आहे.


"जीव मुठीत धरून कापसाची साठवणूक करावी लागते. अनेक संकटांचा धोका पत्करून दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस ठेवावा लागतो. एवढे करूनही दर काही वाढले नाही. नाईलाजाने आता कापसाची विक्री करावीच लागणार आहे." 
- दिलीप पुनसे, शेतकरी पढेगाव.


"कापसाचे दर वाढतील, या आशेने कापूस ठेवला आहे. पण, दरवाढ होण्याचे चिन्ह दिसत नाही. वर्षाचा आर्थिक व्यवहार चालविण्यासाठी कापूस, तर विकावाच लागणार आहे."
- अतुल घोडे, शेतकरी चिकणी.

Web Title: White gold at home! Farmers are waiting for price hike; Farmers are in enough financial trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.