पांढरे सोनं चकाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:03 PM2018-11-05T22:03:56+5:302018-11-05T22:04:13+5:30

आनंद इंगोले । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : यावर्षी पावसाच्या हुलकावणीने कापसाचे उत्पादन घटले आहेत. परिणामी आंततराष्ट्रीय बाजारात तेजी ...

White gold glistening | पांढरे सोनं चकाकणार

पांढरे सोनं चकाकणार

Next
ठळक मुद्देउत्पादनात घट : भाव सहा हजार पार होण्याची शक्यता

आनंद इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यावर्षी पावसाच्या हुलकावणीने कापसाचे उत्पादन घटले आहेत. परिणामी आंततराष्ट्रीय बाजारात तेजी राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पांढऱ्या सोन्याचे भाव दिवाळीनंतर वधारण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा भाव ६ हजारांचाही पल्ला पार करणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन कापसाची विक्री करण्याची गरज आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून दगाफटकाच बसला आहे. मागील वर्षी कापूस उत्पादकांना गुलाबी बोंडअळीच्या प्रकोपामुळे नुकसान सहन करावे लागले. तर यावर्षी परतीच्या पावासाने पाठ फिरविल्याने उत्पादनात मोठी घट झाली. कोरडवाहू शेतकऱ्यांचे उत्पादन निम्यावर आले असून सिंचनाची सोय असलेल्या कापूस उत्पादनकांनाही यावर्षी तुट सहन करावी लागत आहे. मागील दोन वर्षापूर्वी एकारी १२ ते १४ क्विंटल कापूस झाला. परंतु, मागील वर्षी आणि यंदा हा उतारा केवळ सहा ते दहा दरम्यानच स्थिरावला आहे. काही भागांमध्ये पहिल्याच वेच्यात उलंगवाडी झाल्याची स्थिती पहावयास मिळते.
यामुळे उत्पादनात घट असल्याने शासनाचा ५ हजार ४५० रुपयाचा हमीभाव पार करुन कापसाला सध्या ५ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हा भावही मागील काही दिवसांपासून कमी झाला नसल्याने दिवाळीनंतर वधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत चांगल्या प्रतिचा कापूस निघणार असल्याने या कापसाला सहा हजार रुपयांपेक्षाही जास्त भाव मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. सध्या सीसीआयपेक्षाही अधीक भाव शासनाकडून मिळत असल्याने शेतकरी बाजार समित्यांकडेच धाव घेत आहेत. यावर्षी शेतकºयांनी सहा हजार रुपयापेक्षाही जास्त भाव मिळाला तर शेतकºयांना तेवढाच आधार होईल, असे कपाशी उत्पादक शेतकºयांकडून बोलले जात आहे. शासनानेही उत्पादन खर्चावर आधारीत कापसाला भाव देण्याची मागणी आहे.
दुष्काळाच्या सावटामुळे उलंगवाडी
जिल्ह्यात सध्या दुष्काळाचे सावट असल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. तसेच जलाशयही तळच दाखवत असल्याने शेतकऱ्यांना आता सिंचनाकरिता अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांना पाण्याअभावी कापूस उत्पादनात घट सहन करावी लागत आहे. तर कोरडवाहू शेतकऱ्यांची पहिल्याच वेच्यात उलंगवाडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

यावर्षी कापसाचे पीक कमी झाले असून कोरवाहू कापसाच्या उत्पन्नात जवळपास ३० ते ४० टक्के घट झाली आहे. कापसाच्या भाव वाढीचा प्रश्न जागतिक दर्जाचा आहेत.सध्या सुताचे व कापडाचे भाव कमी आहेत. त्या भावात वाढ झाली तर कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.पण, कापसाचे भाव यापेक्षा कमीही होणार नाही.
- अ‍ॅड.सुधीर कोठारी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट

मोदी सरकारने हमीभाव वाढविल्यामुळे कापसाचे दर वाढलेले नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे अवमुल्यन झाल्यामुळे कापसाचे दर वाढले आहेत. मागील वर्षी शासनाने ४ हजार ३०० रुपये हमी भाव जाहीर केल्यानंतर बाजारपेठेत कापूस ५ हजार २०० रुपयापर्यंत गेला होता. यावर्षी ५ हजार ४५० रुपये हमीभाव दिल्यानंतर कापसाचे भाव ५ हजार ८०० पर्यंत पोहोचले यात काही वावगं नाही. जागतिक बाजारात तेजी असल्याचे सांगितले जाते त्यानुसार कापसाला फारसा भाव मिळालेला नाही. सरकीचे आणि रुईचेही भाव कमी आहे. याच्या भावात वाढ झाली तरच कापसाचा भाव आणखी वाढू शकतो.
-विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे पाईक

Web Title: White gold glistening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.