पांढरे सोने करणार मालामाल; २.१५ लाख हेक्टरवर होणार लागवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 05:00 AM2022-04-20T05:00:00+5:302022-04-20T05:00:30+5:30
सध्या कापसाला जास्तीत जास्त १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. एकूणच दोन ग्रॅम पिवळ्या सोन्याच्या बरोबरीनेच सध्या कापसाला भाव मिळत असून, यंदाच्या खरीप हंगामात २.१५ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे निसर्गाची साथ राहिल्यास पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल करेल, असा अंदाज वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पिवळे सोने सध्या प्रतिग्रॅम ५ हजार १००च्या घरात असून, कधी नव्हे तितकी यंदा पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाच्या भावात तेजी आल्याचे वास्तव आहे. सध्या कापसाला जास्तीत जास्त १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. एकूणच दोन ग्रॅम पिवळ्या सोन्याच्या बरोबरीनेच सध्या कापसाला भाव मिळत असून, यंदाच्या खरीप हंगामात २.१५ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे निसर्गाची साथ राहिल्यास पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल करेल, असा अंदाज वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
४ लाख ३७ हजार हेक्टरवर होणार खरीप पिकांचा पेरा
- यंदाच्या खरीप हंगामात किमान ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. आर्वी तालुक्यात ४६ हजार ७९५ हेक्टर, आष्टी तालुक्यात २६ हजार ४२५ हेक्टर, देवळी तालुक्यात ५७ हजार ५८० हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात ८१ हजार ४०५ हेक्टर, कारंजा तालुक्यात ४५ हजार ९५० हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात ७३ हजार ४४० हेक्टर, सेलू तालुक्यात ४६ हजार ७४६ हेक्टर, तर वर्धा तालुक्यात ५८ हजार ८८० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार असल्याचा अंदाज आहे.
७३,५५० हेक्टरवर होणार तूर लागवड
- खरीप हंगामात ७३ हजार ५५० हेक्टर जमिनीवर तूर पिकाची लागवड होणार आहे. आर्वी तालुक्यात १०,७५० हेक्टर, आष्टी तालुक्यात ४ हजार हेक्टर, देवळी तालुक्यात ११ हजार हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १५,५०० हेक्टर, कारंजा तालुक्यात ८,५०० हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात ८ हजार हेक्टर, सेलू तालुक्यात ५ हजार ३०० हेक्टर, तर वर्धा तालुक्यात १० हजार ५०० हेक्टरवर यंदा तुरीची लागवड होणार आहे.
९० मेट्रीक टन खताची राहणार गरज
- विविध पिकांसाठी जिल्ह्याला ९० हजार मेट्रीक टन इतकी खतांची आवश्यकता भासणार आहे. खतांचा पुरवठा करताना आधी तो ग्रामीण भाग व रॅक पॉईंट पासून लांब असणाऱ्या गावांना करण्यात येणार आहे.
- प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे खतांचा पुरवठा न केल्यास किंवा परस्पर पुरवठा कमी जास्त केल्यास वाहतूकदारांवर अत्यावश्यक वस्तु कायाद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.
यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण किमान ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे तर त्याच्या पाठोपाठ सोयाबीन पिकाचे क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही गैरसोईला सामोरे जावे लागू नये अशा पद्धतीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. शिवाय भरारी पथक सज्ज राहणार आहेत.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खत कोंडीला सामोरे जावे लागू नये अशा नियोजनाच्या आपण सूचना दिल्या आहेत.
- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.