भाववाढीच्या अपेक्षेनं पांढरं सोनं घरातच ‘लॉक’; दहा हजारांचा भाव मिळण्याची आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 07:31 AM2021-11-12T07:31:42+5:302021-11-12T07:31:54+5:30
आवक मंदावली; दहा हजारांचा भाव मिळण्याची आशा
वर्धा : अतिवृष्टीमुळे या वर्षी सोयाबीनपाठोपाठ कपाशीचे उत्पन्न घटल्याने बाजारपेठेत सध्या कपाशीला समाधानकारक भाव मिळत आहे. सध्या साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. हा भाव दहा हजार रुपयांचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कापूसविक्रीला ‘ब्रेक’ लावल्याने बाजारपेठेतील आवकही मंदावली आहे.
बोंडअळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे उत्पादनही निम्म्यावरच आले. सध्या एकरी चार ते पाच क्विंटलचा उतारा असून दोनच वेच्यांत कापसाची उलंगवाडी झाली आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही भरून निघणार की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना होती; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही कपाशीला चांगली मागणी असल्याने राज्यातही कपाशीचे भाव सध्या ८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवाळीचा सण आणि रब्बीच्या तयारीकरिता लागणारा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी काही कापूस विकला. आता मात्र शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच साठवून ठेवला आहे.
रब्बीच्या तयारीला वेग
खरीप हंगामात शेतकऱ्यांना जेमतेम उत्पन्न झाल्याने त्यातून खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे दोन वेच्यांत कापसाची उलंगवाडी होताच ट्रॅक्टर फिरवून रब्बीची तयारी सुरू केली आहे. शेतातील मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली, तर काही शेतकऱ्यांच्या पेरण्याही आटोपल्या आहेत.