वर्धा जिल्ह्यात आढळले संकटग्रस्त पांढरे गिधाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 12:09 PM2021-02-06T12:09:28+5:302021-02-06T12:17:02+5:30
Wardha News वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील तलावावर संकटग्रस्त पांढरे गिधाड ३१ जानेवारीला आढळले. अल्पवयीन पांढरे गिधाड प्रजातीच्या पक्ष्याची महत्त्वपूर्ण नोंद पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार राहुल वकारे यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील तलावावर संकटग्रस्त पांढरे गिधाड ३१ जानेवारीला आढळले. अल्पवयीन पांढरे गिधाड प्रजातीच्या पक्ष्याची महत्त्वपूर्ण नोंद पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार राहुल वकारे यांनी केली. ही वर्ध्यातील अलीकडच्या काळातील दुसरी नोंद असून, यापूर्वी नोव्हेंबर, २०१६ला वर्धा शहराजवळ हा पक्षी आढळला होता. संकटग्रस्त, धोक्यात आलेले किंवा जंगलात नामशेष होण्याचा जास्त धोका असलेल्या पक्षी प्रजातीच्या सूचीमधील ही एकमेव पक्षी प्रजाती आहे. या पक्ष्याचे इंग्रजीतील सामान्य नाव इजिप्शियन वल्चर असून, मराठीत याला पांढरे गिधाड म्हणतात. याचे शास्त्रीय नाव निओफ्रॉन पर्क्नोप्टेरस आहे. ही प्रजाती दक्षिण आशिया आणि युरोप, तसेच उत्तर आफ्रिकामध्ये आढळते. संपूर्ण भारतात हा आढळत असून, मुख्यत: उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आढळतो. ई-बर्ड या संकेतस्थळावरील नोंदीनुसार महाराष्ट्रात मात्र मोजक्याच नोंदी आहेत.
भारतात आढळणाऱ्या गिधाडांपैकी लहान आकारचे गिधाड असून, वेगाने यांची संख्या घटत आहे. असे असले, तरीही या पांढऱ्या गिधाडाच्या अल्पवयीन पक्ष्याच्या दर्शनाने खडकाळ भागात अधिवास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यांच्या अधिवासाच्या परिसराचे रक्षण आणि त्याच्या सभोवतालच्या तलावांचे संवर्धन करण्याची गरज आहे. वनविभाग, पक्षिमित्र आणि गावकरी यांच्या सहकार्याने याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांच्या अधिवासाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा मानस पक्षी अभ्यासक राहुल वकारे यांनी व्यक्त केला.
आणखी एक दिलासादायक नोंद
प्रतिक्रिया- गिधाडे नष्टप्राय होण्याची अनेक कारणे असली, तरी या प्रजातीतील पांढरे गिधाड हे मानवी वस्तीजवळ राहणारे आणि माणसांना न घाबरणारे असल्यामुळे धोका अधिक संभवतो. नोंद घेण्यात आलेला हा पक्षी अल्पवयीन आहे. म्हणजेच त्याची अद्याप पूर्ण वाढ झालेली नाही. याचाच अर्थ आपल्या परिसरात या पक्ष्याचे घरटे आणि पांढऱ्या गिधाड पक्ष्यांची जोडी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागानेही याची नोंद व शोध घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- संजय इंगळे तिगावकर, मानद वन्यजीव रक्षक, वर्धा जिल्हा
गिधाडांप्रमाणेच अनेक पक्षी आज मानवाच्या आपमतलबी धोरणामुळे धोक्यात आहेत. कीटकनाशकांचा थेट परिणाम त्यांच्या प्रजननावर होत आहे. याची गंभीर दखल घ्यावी लागेल, अन्यथा येणाऱ्या काळात पक्ष्यांच्या नामशेष होणाऱ्या प्रजातींची संख्या प्रचंड असेल. त्यामुळे आपणास वेळीच कीटकनाशकांवर लगाम कसून शेतकऱ्यांसाठी पर्यायी नैसर्गिक मार्ग शोधावे लागतील व ते अवलंबवावे लागतील. कीटकनाशकाचे थेट परिणाम पक्ष्यांच्या प्रजननावर होत असतानाही, आज त्या दृष्टिकोनातून शास्त्रीय अध्ययन फारच कमी होत असल्याने, शासनाने अशा अध्ययनासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.
- पराग दांडगे, सल्लागार, बोर व्याघ्र प्रकल्प, वर्धा